आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास टक्के आरक्षण असतानाही महिला आघाड्यांविषयी उदासीनता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत महिला सदस्यांची संख्या वाढणार आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत. असे असताना शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीचा अपवाद वगळल्यास इतर राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांमध्ये उदासीनता असल्याचे चित्र आहे.

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे प्रभाग, गट-गणांची रचना, मतदार याद्या तयार करणे, मतदार केंद्रांची नावे जाहीर करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका घेण्यात येत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने राजकीय पक्षांना निम्म्या जागांवर महिला उमेदवारांना संधी द्यावी लागणार आहे; परंतु कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी प्रमुख राजकीय पक्षांचा आढावा घेतला असता, बहुतांश राजकीय पक्षांमध्ये महिला आघाडीबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची सहा महिन्यांपूर्वीच निवड झाली आहे ; परंतु इतर पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोजकी नावे वगळता इतर कोणाचीही नावे कार्यकर्त्यांना सांगणे शक्य होणार नाही. तसेच भारतीय जनता पक्षातर्फे अद्याप महिला आघाडीच्या शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आलेली नाही.

पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या वादामुळे महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्तीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून महिला आघाडीला कितपत स्थान मिळेल, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी योग्य उमेदवार न मिळाल्यास सर्वच जागांवर महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मेळावाही घेण्यात आला होता; परंतु लोकसंग्राम महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची अद्यापही निवड झालेली नाही. त्यामुळे महिला आघाड्यांसंदर्भात एकंदरीतच उदासीन वातावरण आहे.

हे मुद्देही आहेत महत्त्वाचे
सद्य:स्थितीत महानगरपालिकेत महिलाराज.
महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी.
शिवसेना व मनसेच्या महिला आघाडीकडून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन.
राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या काही पदाधिकारी वगळता इतरांबद्दल माहिती नाही.
आमदार अनिल गोटेंनी काही दिवसांपूर्वी केली होती मनपा निवडणुकीत अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा.

महिला उमेदवारांची शोधाशोध

महापालिकेची निवडणूक प्रभागनिहाय होईल. एका प्रभागात दोन वॉर्ड असतील. लोकसंख्यावाढीमुळे तीन नगरसेवक वाढतील. त्यामुळे 70 नगरसेवक निवडून येतील. त्यात 35 महिला नगरसेविका असतील. याशिवाय इतर वॉर्डांतूनही महिला निवडून येऊ शकतात. त्यामुळे राजकीय पक्षांना महिला उमेदवारांसाठी शोधाशोध करावी लागेल. काही नगरसेवकांच्या वॉर्डात महिलांचे आरक्षण निघाले तर ते कुटुंबातील महिलेला उभे करतील.