आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचारी-विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; तहसीलदारांकडून कर्मचार्‍याना समज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - नियमानुसार नमूद तारखेला दाखले न मिळाल्याने संतप्त विद्यार्थी आणि तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये फ्री स्टाइलने हाणामारी झाली. बुधवारी दुपारी 1 वाजता झालेला हा प्रकार शहरात दिवसभर चर्चेत होता.

नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल लागल्याने शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले काढताना विद्यार्थी-पालकांची धावपळ उडाली आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा कक्षातून हे दाखले मिळतात. मात्र, विनंती करूनही वेळेत दाखले मिळत नसल्याने बुधवारी विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट झाला. सेतू सुविधा कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर थेट हाणामारी झाली. यामुळे सेतू सुविधा कक्षाजवळ मोठीच गर्दी झाली. हाणामारी झालेले तरूण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर हा वाद मिटला. दरम्यान, गरजेच्या वेळी वेळेवर दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना नसता मनस्ताप
तालुक्यातील मेळसांगवे येथील ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्याने उत्पन्नाचा दाखला मिळणेसाठी अर्ज केलेला आहे. 23 जूनला दाखला मिळणार होता. मात्र, 25 जून येऊनही दाखला न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. पावतीवर टाकलेल्या तारखेप्रमाणे दाखले वितरित होत नसतील तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिकांना नसता मनस्ताप का? असा प्रश्न केला.
तहसीलदारांनी घेतली दखल
सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीची तहसीलदार जी.एन.पाटोळे यांनी गंभीर दखल घेतली. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याबाबत कर्मचार्‍यांना समज देण्यात आली. तसेच 15 दिवस केंद्राजवळ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षकांना केली.
लोखंडी ग्रील बसणार
तालुक्यात नियुक्त असलेले पाच महा ई-सेवा केंद्र संचालकांची बैठक तातडीने घेण्याची सूचना तहसीलदार पाटोळे यांनी नायब तहसीलदारांना केली. तसेच सेतू सुविधा केंद्रातील दरवाजाला लोखंडी ग्रील पूर्ण करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले.
कक्षामध्ये वशिलेबाजी
ओळखीचे नागरिक, विद्यार्थ्यांकडून परस्पर प्रकरणे घेतली जातात. मात्र, सेतू सुविधा कक्षात प्रामाणिकपणे प्रकरणे सादर केल्यावर मुदतीत दाखले मिळत नाहीत. विशेष म्हणजे दाखले कधी मिळतील? याची पावतीवर तारीख असते. विद्यार्थी मात्र लांब अंतरावरून ठरलेल्या तारखेला तहसीलमध्ये येतात.
शिबिरे हवीत
दाखले मिळवताना विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालये किंवा महत्त्वाच्या गावांमध्ये महसूल विभागाने दाखले वाटप शिबिरांचे आयोजन करावे, असाही सूर उमटला. मध्यंतरी रावेर तालुक्यात या पद्धतीने शाळांमध्ये जाऊन दाखले वाटप करण्यात आले होते.