आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Workers Face Hours A Tent Whigat In Jalgaon Municipal Corportion

जळगाव पालिकेत पाऊण तास कर्मचार्‍यांनी सोसला तंबूचा भार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेच्या प्रांगणात बुधवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाची उभारणी व्यवस्थित न करण्यात आल्याने कार्यक्रम संपेपर्यंत मंडपाचा भार टेंटचालकाच्या कर्मचार्‍यांना सोसावा लागला. अधिकारी व पदाधिकार्‍यांसमोर मानवाधिकारहननाचा प्रकार सुरू असताना एकानेही या प्रकाराला विरोध केला नाही.

महापालिका आणि रोटरी क्लब, जळगाव ईस्टतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या समारोपानंतर पालिकेच्या आवारात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापौर किशोर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांच्यासह पालिकेचे अधिकारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपाची उभारणी व्यवस्थित केली गेली नसल्याने कार्यक्रम पार पडेपर्यंत पाऊण तास टेंटचालकाच्या कर्मचार्‍यांना खांबांच्या दोर्‍या ताणून ठेवणे व खांब धरून ठेवण्याची कसरत करावी लागली. या वेळी मानवाधिकाराचे उल्लंघन होत असताना अधिकारी व पदाधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली.


हे तर मानवाधिकाराचे उल्लंघनच
टेंटचालकाने स्वत:च्या आर्थिक हितासाठी कर्मचार्‍यांना पाऊण तास अशा प्रकारे त्रास देणे हा शोषणाचा प्रकार असून, मानवाधिकाराचे उल्लंघनच आहे. याबाबत संबंधित कर्मचार्‍यांनी आमच्या संघटनेकडे तक्रार केल्यास टेंटचालकाविरुद्ध पुढील कारवाई करता येऊ शकते. आम्ही मात्र तशी कारवाई करू शकत नाही. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ


हा टेंटचालकाचा हलगर्जीपणा
पालिका आवारात आयोजित कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याची जबाबदारी टेंटचालकाला दिली होती. त्याने मंडपाची उभारणी व्यवस्थित केली नसल्याने त्याच्या हलगर्जीपणाचा त्रास त्याच्या माणसांना सोसावा लागला. या चुकीच्या गोष्टीचे मी सर्मथन करणार नाही. किशोर पाटील, महापौर

दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी
पालिका आवारात कॉँक्रिटीकरणामुळे खुंट्या ठोकणे शक्य नव्हते. कार्यक्रमाच्या वेळी हवेचा वेग वाढल्याने मंडप पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी कर्मचार्‍यांनी त्याला आधार देण्याची भूमिका घेतली असेल. वातावरण खराब नसते तर असा आधार देण्याची गरज भासत नाही. प्रीतीश चोरडिया, संचालक प्रितीश टेंट