आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Works Of Dhule Corporation : Toll Collection Defecit 60 Lakhs Ruppesa

कारभार धुळे महापालिकेचा : जकात वसुलीत दरमहा 60 लाख रुपयांची तूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जकातीचा ठेका दिला गेला नसल्याने महापालिकेतर्फे सध्या जकात वसूल करण्यात येत आहे. जकातीचा ठेका देण्यासाठी आतापर्यंत सात वेळा फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, अपेक्षित रक्कम प्राप्त होत नसल्याने जकातीचा ठेका दिला जात नाही. महापालिकेच्या कर्मचार्‍यांतर्फे होत असलेल्या वसुलीत साधारणपणे 60 लाखांची तूट महिन्याला येत आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी महत्त्वाचा स्रोत म्हणजे जकात आहे. 2011-12 साठी जकातीचा ठेका देण्यात आला होता. त्यानंतर 2012-13साठी जकातीचा ठेका देण्यासाठी निविदा काढण्यात आली. 73 कोटी रुपयांची ऑफसेट रक्कम ठरविली असताना 69 कोटी रुपयांची निविदा प्राप्त झाली होती. मात्र, अपेक्षित रकमेपेक्षा कमी रकमेला ठेका देऊ नये, असे स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याचा निर्णय शासनाकडे पाठविला होता. शासनाने पुन्हा महापालिकेला निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानंतर स्थायी समितीने पुन्हा 69 कोटी रुपयांची ऑफसेट रक्कम निश्चित करून निविदा काढली. त्यात र्शीकृष्ण खांडसरी यांनी निगोसिएशनअंती 69 कोटी 25 लाख रक्कम भरली. मात्र, यात दोन निविदा प्राप्त झाल्या. तसेच प्रशासनाने माहिती उशिरा दिली म्हणून निविदेचा विषय नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे जकात वसूल करणे सुरू आहे. साधारणपणे 70 ते 71 कोटी रुपयांचा ठेका अपेक्षित आहे. महापालिकेतर्फे जकात वसुलीसाठी विविध विभागातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जकात नाक्यावर साधारणपणे 125 कर्मचारी सद्य:स्थितीत काम करीत आहेत. मात्र, त्यातही इतर विभागाच्या कामावर ताण पडत आहे. वसुली विभागातील बहुतांशी कर्मचारी जकात वसुलीच्या कामावर आहेत. त्यामुळे साहजिक वसुलीच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. महापालिकेचे कर्मचारी सर्व नाक्यांवरून वसुली करीत असले तरी पूर्ण क्षमतेने करीत नाही. कारण खासगी ठेकेदार आणि महापालिका यांच्या वसुलीत फरक आहे. महापालिका साधारणपणे वर्षाला 68 कोटी रुपयांपर्यंत वसुली करू शकते. तर खासगी ठेकेदार 70 कोटींच्या आसपास करू शकतो. त्यामुळे वसुलीत दररोज साधारणपणे दीड ते दोन लाख रुपयांची वाढ अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत दररोज सरासरी 16-17 लाख वसुली होते. ती साधारणपणे 20 लाख होणे अपेक्षित आहे. खासगी जकात ठेकेदाराने 250 व्यक्तींची जकात नाक्यावर नियुक्ती केली होती. त्यामानाने महापालिकेचे कर्मचारी कमी आहेत. जकात विभागात अजून कर्मचार्‍यांची संख्या वाढवू शकत नाही. यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढलेला आहे.

कर्मचार्‍यांचे बदलीसाठी प्रयत्न
जकात वसुलीसाठी विविध जकात नाक्यावर महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र अशा दोन पाळीत हे काम करावे लागत आहे. येथील कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचारी एक तर रजा मागतात किंवा जकात विभागातून महापालिकेत दुसर्‍या विभागात बदली करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

पारगमनातून 35 कोटींची वसुली
जकात वसुलीतून 65 कोटी रुपयांची वसुली पालिका करीत आहे. मात्र, यात सर्वाधिक वाटा हा एस्कॉर्टमधून मिळणारा आहे. जकात वसुली ही 45 टक्केतर एस्कॉर्ट वसुली ही साधारणपणे 55 टक्केआहे. धुळे शहरातून दोन महामार्ग जात असल्याने त्याचा लाभ मिळत आहे. शहरातून जाणार्‍या प्रत्येक मालवाहू ट्रकधारकांकडून शंभर रुपये एस्कॉर्ट फी वसूल केली जात आहे. ती दीडशे रुपये करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे अनेक दिवसांपासून पडून आहे.