आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही जळगावकर आता 5 लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 2000-2001 मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या 36 लाख 82 हजार 690 होती. 2011 च्या जनगणनेनुसार ती 42 लाख 24 हजार 425 इतकी म्हणजे 5 लाख 41 हजार 735 ने वाढली आहे, तर जळगाव शहराची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार 3 लाख 68 हजार 579 इतकी नोंदवली गेली. 2011 मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेत 4 लाख 60 हजार 468 इतकी आहे. म्हणजे 10 वर्षात शहराची लोकसंख्या 91 हजार 889 ने वाढ झाली आहे.
वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून, झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येला आळा घालण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शहर व जिल्ह्याचा वाढता भार विकासास मारक ठरत असून, यामुळे प्रशासनाला नियोजन करण्यातही अडचण येत आहे.
नागरी सुविधांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते. मात्र लोकसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र कर्मचार्‍यांची संख्या जैसे थेच असल्याने अनेकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार वर्षांपासून शहर व जिल्ह्याला पाणीप्रश्न भेडसावत आहे. वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक ताण पाणीपुरवठा करण्यावर दिसून येत आहे.
स्थलांतराचे वाढते प्रमाण - घरातील सदस्यांची संख्या अधिक झाल्याने त्या प्रमाणात गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. तसेच शिक्षणासाठीही अनेक विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर होत आहे. त्यामुळे शहराचे विकासाच्या दृष्टिकोनातून केलेले सर्वच नियोजन ढासळत आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी या सार्‍यांसाठी शहरात दाखल होऊन स्थायिक होणार्‍यांचे प्रमाणही वाढल्याने शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण विविध यंत्रणांवर दिसून येत आहे. वाढती गुन्हेगारी, आरोग्याचा प्रश्न, शाळा, महाविद्यालयांतील दाखले या सार्‍यांवर लोकसंख्यावाढीचा ताण दिसून येत आहे.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील उपलब्ध नोंदीनुसार चालू वर्षी जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत शहरातून 6 हजार 636 विद्यार्थी बसले होते. त्यातील 4 हजार 658 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 12 वीच्या परीक्षेत जिल्ह्यातून 42 हजार 768 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 25 हजार 891 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी अकरावीसाठी शहरात ज्या जागा होत्या त्या अपूर्ण पडल्या होत्या. त्यामुळे त्यात यंदा वाढ करण्यात आली आहे. शहरात 11 वीसाठी 23 कॉलेजेस आहे. त्यात 8 हजार 880 जागा तर जिल्ह्यात 223 महाविद्यायात 41 हजार 800 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी वाढत्या विद्यार्थी संख्येचा अतिरिक्त ताण शिक्षण संस्थांवर पडत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस कमी, गुन्हे वाढले - मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्याच याला मुख्य कारण आहे. एकीकडे गुन्हेगारी आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पोलिस कर्मचार्‍यांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासत आहे. जिल्ह्यातील 42 लाख लोकसंख्येसाठी केवळ 3500 कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहे. परंतु प्रत्यक्षात आज 4200 पोलिसांची गरज आहेत. त्यामुळे 700 ने पोलिसांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
लोकसंख्यावाढीला जबाबदार असल्याची विविध कारणे
बालविवाहाचे प्रमाण
दोन मुलांमधील अंतर कमी असणे
मुलगाच हवा असा अट्टहास
लैंगिक शिक्षणाचा अभाव
अनैच्छिक गर्भधारणा
मृत्युदर कमी झाला. परंतु, जन्मदरात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे
वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रणासाठी उपाय
जन्मदर कमी करण्यासाठी उपयोजना करणे
लैंगिक शिक्षण देणे
कुटुंब नियोजनासाठी मार्गदर्शन करणे
गर्भनिरोधक साधनांचा प्रचार-प्रसार करणे
जिल्ह्यात एक लाख सुशिक्षित बेरोजगार - वाढत्या लोकसंख्येमुळे देशात बेरोजगार युवकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 86,109 युवक तर 14,682 मिळून 1 लाख 791 बेरोजगारांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नोंदणी केली आहे. एम्प्लॉयमेंट कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर रोजगारांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयातर्फे काही बेरोजगारांना मुलाखतीसाठी पत्र पाठवून संधी दिली जाते. दररोज नोंदणीसाठी रांगा लागत असल्या तरी वर्षभरात केवळ 2500 ते 3000 बेरोजगारांनाच रोजगार उपलब्ध होतो. नोंदणी व संधी यामध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर तफावत असल्यामुळे बेरोजगारीचा चढता आलेख तयार झाला आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी नोंदणी करून ठेवतात. मात्र, जे मुल शिक्षणच घेऊ शकत नाही. यापैकी फार थोडी मुले एम्प्लॉयमेंट कार्यालयात नोंदणी करतात. त्यामुळे नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या किती असेल याचा अंदाज घेणे कठीण आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर साक्षरतेचा टक्काही वाढतोय - सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत 14.71 टक्क्यांनी वाढ झाली असून, साक्षरतेचा टक्कादेखील वाढला आहे. सन 2001मध्ये जिल्हय़ात 75.43 तर 2011मध्ये 79.73 टक्के साक्षरतेचे प्रमाण आढळून आले असून, तब्बल चार टक्क्यांनी साक्षरता वाढली आहे. त्यात ग्रामीण भागाची 76.04 तर शहरी भागाची साक्षरता 87.51 टक्के आहे.
आर्थिक विकास मंद - लोकसंख्यावाढीचा परिणाम रोजगार आणि दरडोई उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे शहराचा आर्थिक विकास मंदावत असून, वाढत्या वसाहतींमुळे शहर विस्तारीकरणासाठी शेतजमिनींचा वापर वाढत आहे. परिणामी शेतीचे क्षेत्र कमी होत त्याचे रूपांतर रहिवासी भागात होत आहे. प्रा.एस.डी. जोशी, अर्थशास्त्र, मूजे महाविद्यालय
जागृती करणे गरजेचे - लोकसंख्यावाढीबाबत जनतेत अद्यापही जनजागृती नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. तसेच वाढीचे दुष्परिणामही नागरिकांना पटवून देण्याची गरज आहे. ‘हम दोन, हमारा एक’ असे ब्रीद सर्वांनी ठरविल्यास पुढील 50 वर्षांत 35 टक्के लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. प्राचार्य डी.एफ. पाटील, पाचोरा