आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Women's Day Specials Jalgaon Women Success In Law

विधिसेवा प्राधिकरणामुळे मिळतेय महिलांच्या लढय़ाला बळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बर्‍याचदा घरच्यांचा पाठिंबा व हलाखीच्या परिस्थितीमुळे महिलांना कायद्याच्या लढाईत पराभवाला सामोरे जावे लागते; परंतु गेल्या काही वर्षांत महिलांनी कायद्याची लढाई जिंकल्याची अनेक उदाहरणे पुढे येऊ लागली आहे. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेविषयक मदत सहज व मोफत उपलब्ध होत असल्याने महिलांच्या लढय़ाला बळ मिळू लागले आहे.

पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना वारसासाठी आपल्याच नातेवाइकांशी लढावे लागते. तसेच अनेकदा सासरी होणार्‍या छळाने त्रस्त महिला केवळ शिक्षण व पैशांअभावी न्यायापासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे; परंतु ज्यांना सरकारी खर्चाने मदत लागत असेल, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे स्वत:च्या हस्ताक्षरात अर्ज करायचा असतो. त्यानंतर अशा महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्याबाबत पॅनलवरील इच्छुक वकिलाची मदत दिली जाते. नंतर ते वकील न्यायालयात पीडिताच्या बाजूने काम पाहतात. अशा प्रकरणात महिलेने वकिलाला फी देण्याची गरज नसते. त्यामुळे महिलांना शक्ती मिळाली आहे.

उत्पन्नाची अट नाही
याबाबत आता जनजागृती होऊ लागली असल्यामुळे कायदेविषयक मदती मागण्यात पुरुषांसोबतच महिलांचेही प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. ज्या पुरुषांचे वार्षिक उत्पन्न 50 हजारांपेक्षा जास्त नसेल अशा पुरुषांना मोफत मदत मिळते; परंतु महिलांना वार्षिक उत्पन्नाची अट नाही. त्यामुळे केवळ गरीब महिलाच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील महिलाही मदतीसाठी विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकते.

यात मिळू शकते मदत
वैवाहिक खटल्यांमध्ये नांदवणे, घटस्फोट, खावटी मिळणे, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005अंतर्गत खटले, पतीकडून मारहाण, शेतजमिनीबाबत वारसा हक्काचे दावे, मोटार अपघात दावे यासंदर्भात महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला उपलब्ध होऊ शकतो.

दुर्गम भागात मार्गदर्शन
शहरी भागात कायदेविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकते; परंतु ग्रामीण व दुर्गम भागात महिलांना कायदेविषयक माहिती देण्याचे काम अँड.हरूल देवरे यांच्या धनर्शी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 3 वर्षांपासून सुरू आहे. मार्गदर्शनासाठी न्यायाधीश, सरकारी वकील, पोलिस अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग असतो. तसेच अँड.देवरे हेच 11 खटल्यांमध्ये महिलांच्या बाजूने काम पाहत आहेत.

महिला वकिलांचा सहभाग
जळगाव न्यायालयात मेडिएशन क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. त्यात न्यायालयात दावे दाखल होण्यापूर्वी तडजोडीसाठी दोन्ही पक्षांना अर्ज करावा लागतो. त्यासाठी सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात चार महिला वकिलांचा समावेश आहे. अँड. संध्या कांडेलकर, अँड.नेहा चौरसिया, अँड. अंबुजा वेदालंकार व अँड.सुनंदा लोढा या चार महिला वकिलांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

केस -2 : भुसावळ येथील पीडित महिलेने पतीसह आठ आरोपींविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात भुसावळ न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निदरेष मुक्तता केली होती. त्यामुळे पीडित महिलेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वकिलासाठी अर्ज केला होता.

>सन 2012मध्ये वकिलासाठी 59 अर्ज आले होते. त्यात 11 अर्ज महिलांचे होते.
> जानेवारी 2013पासून आजपर्यंत वकिलासाठी 33 अर्ज आले असून, त्यात 5 अर्ज महिलांचे आहेत.