आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestling News In Marathi, Nitin Gawali Win Maharashtra Kesari, Divya Marathi

मोलकरणीच्या ‘लाल’ने कुस्तीत केली कमाल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कुस्ती हा तसा लाल मातीतला खेळ.. एकीकडे कुस्तीत नाव कमावण्याचे स्वप्न.. दुसरीकडे उणिवांचा डोंगर.. घरी अठरा विश्वे दारिद्रय़..भांडवल म्हणून केवळ एक लंगोट.. खुराक हाच खरा कळीचा खर्चिक मुद्दा! मोठय़ा कष्टाने आणि जिद्दीच्या बळावर जळगावच्या नितीन गवळीने हा डोंगर अखेर पार केला. पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या बहाद्दराने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली !

शनिपेठेतील गवळीवाड्यात राहणारा नितीन मल्लेश्याम गवळी, वडिलांचे नाव मल्लेश्याम पित्याच्या नावातील मल्ल या शब्दाचा योगायोग वगळता कुस्तीशी गवळी कुटुंबाचा काहीही संबंध नाही. घराजवळ शिवभक्त व्यायामशाळा. या व्यायामशाळेत नेमाने येणार्‍या कुस्तीगिरांना नितीन नेहमीच न्याहाळत असे. एकापेक्षा एक पट्टीचे पहिलवान पाहताच त्याने ठरवून टाकले, पैलवानी करायचीच ! कुस्तीत भविष्य साकारायचे. व्यायामशाळेच्या वस्तादांनाही हा इटुकला पहिलवान भावला. कुस्तीचे धडे सुरू झाले. लाल माती चांगलीच अंगात भिनली.

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 17 वर्षाच्या नितीनने 55 किलो वजनाच्या वरिष्ठ गटात उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली. आतापर्यंत त्याने राज्यस्तरावरील अनेक कुस्ती स्पर्धा गाजविल्या आहेत, शिवाय राष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. या यशाद्वारे त्याने आपण कुस्तीतील उगवता तारा आहोत हे सिद्ध केले आहे.

नितीन आपल्या यशाचे सारे र्शेय आई मंजू आणि प्रशिक्षक जगदीश चौधरी यांना देतो. नितीन 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आईने दुसर्‍याच्या घरी धुणी-भांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवला आणि आजही चालवत आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी नितीनने शालेय कुस्ती स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षात त्याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पदक मिळवून जिल्ह्याचे नाव गाजवले. औरंगाबाद येथे 2009-10 मध्ये आणि अहमदनगर येथे 2010-11 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अमरावती येथे झालेल्या 34 व्या राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा सुशील कुमार हा नितीनचा आदर्श असून एकदिवस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे.

रीडा संकुलात घेतले धडे
नितीन जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेत दहावीचा विद्यार्थी आहे. जवळच असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्ती केंद्रात डावपेच कसे असतात? हे बघण्यासाठी तो दररोज जात असे. त्याची जिज्ञासा प्रशिक्षक जगदीश चौधरी यांनी ओळखली. त्यांनी नितीनला रिंगणात घेतले व कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली.