आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांझोट्या धोरणामुळे ‘स्टिंग’चे वाजले बारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-लिंग निदानचा काळा धंदा करणार्‍यांचा पर्दाफाशसाठी कराव्या लागणार्‍या ‘स्टिंग’ ऑपरेशनला निधी मिळत नसत्यामुळे महिला संघटनांकडून होणारे ‘स्टिंग’ कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टर स्वत:चे उखळ पांढरं करून घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी शहरातील महिला संघटनांनी केलेल्या खर्चाचा एक पैसाही महापालिकेने अद्याप अदा केलेला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात एकही ‘स्टिंग’ होऊ शकलेले नाही. प्रशासनातर्फे केवळ खबर्‍याला बक्षीस देण्याची कायद्यात तरतूद असल्याचे कारण पुढे केले जातेय.
महापालिका आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून धाडी टाकून सोनोग्राफीच्या माध्यमातून लिंग निदानाच्या कामांना आळा घालण्याचा प्रयत्‍न केला जात आहे. त्याचबरोबर गर्भपात करणार्‍यांसाठी ‘स्टिंग’चा रामबाण उपाय अमलात आणण्यात आला होता. त्यामुळे गोरखधंदा करणार्‍या डॉक्टरांमध्ये दहशत निर्माण झाली होती. परंतु आता ‘स्टिंग’ ऑपरेशन करणे परवडणारे ठरत नसल्याने यासाठी पुढाकार घेणार्‍या महिला संघटनांच्या पदाधिकार्‍यांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजीचा सूर आहे.
स्टिंगपूर्वीची प्रक्रिया : गर्भपात करणार्‍या डॉक्टरांची खात्री पटल्यानंतर त्याचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वात अगोदर ओळख न पटणार्‍या गर्भवती महिलेचा शोध घेतला जातो. सहसा गावापासून लांब असलेल्या महिलेने गर्भपाताच्या घटना रोखण्याच्या कार्यात मदत करण्यास होकार दिल्यानंतर संशयित डॉक्टरांकडे तपासणीसाठी आणले जाते. यावेळी संबंधित महिलेसोबत नातलग महिलांनाही आणावे लागते. त्यांच्या प्रवासाचा तसेच खाण्यापिण्याचा खर्च करावा लागतो. दोन-चार वेळा तपासणीनंतर लिंग निदान करण्यासाठी विचारणा केली जाते. त्यासाठी होकार देताच स्टिंगची प्रक्रिया राबवली जाते.
महापाला क्षेत्रात मोठे अडथळे
शहरात सर्वाधिक 48 सोनोग्राफी सेंटर आहेत. तसेच 19 डॉक्टरांविरुद्ध खटले दाखल आहेत. डॉ.राहुल कोल्हे यांच्या पद्मावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी स्टिंग झाले होते. या प्रकरणात स्वयंसेविकेला 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. परंतु या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पर्शिम घेणार्‍या महिला संघटनेचे साधे प्रशासनाने कौतुकही केले नाही. त्यामुळे शहरात पर्दाफाशचे काम जवळपास थांबल्यासारखे आहे.
स्टिंगसाठी येतो प्रचंड खर्च
डॉक्टरांनी लिंगनिदान करण्यास होकार दिल्यानंतर गर्भवती महिलेसोबत असलेल्या व्यक्तींजवळ हिडन कॅमेरा, रेकॉर्डर यासारख्या महागड्या वस्तुंचा वापर करण्यासाठी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे निदानापूर्वी डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम अदा करावी लागते. हा सर्व खर्च सुमारे 35 ते 40 हजारांपर्यंत जातो. याव्यतिरिक्त येण्याजाण्याचा खर्च हा वेगळाच असतो. परंतु कायद्यानुसार केवळ 25 हजार रुपये देण्याची हमी प्रशासन घेते. त्यामुळे महिला पदाधिकार्‍यांना उर्वरित खर्चाची आर्थिक झळ सहन करावी लागते.