आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ कार्यालयाने मुलाला केले हिंदू तर वडिलांना मुस्लिम; पत्ताही चुकवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरटीओ कार्यालयातील अनागोंदी कारभारावर होणा-या टीकेला बळ मिळणारा किस्सा नुकताच घडला आहे. मुलगा हिंदू तर वडिलांचे नाव मुस्लिम नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे फोटो व सही बरोबर असताना वडिलांचे नाव व पत्ता चुकीचा दिल्याने धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या तरुणाची दुरुस्तीसाठी फरपट होत आहे.

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील कमलाकर बाळू शिरसाठ हा ट्रॅक्टर चालवतो. परंतु शासकीय सेवेत वाहनचालकाची संधी मिळावी म्हणून त्याने अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी त्याला महिनाभरापूर्वी लर्निंग लायसन्स देण्यात आले. त्यात स्वत:चे नाव कमलाकर शिरसाठ दिलेले असून वडिलांचे नाव मोहंमद जलालुद्दीन फारुकी असे लिहले आहे. तर पत्तादेखील नांदेडऐवजी मारूळ, तालुका यावल असे आहे. विशेष म्हणजे लायसन्सवर फोटो व सही त्याचीच आहे.

याबाबत दुरुस्तीसाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारणा-या या तरुणाची साधी दखलही घेतली नाही. शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना लागणारे लायसन्सचा पुरावा मिळावा म्हणून कमलाकरची धडपड सुरू आहे. परंतु शासकीय यंत्रणेतील गलथान कारभारामुळे त्याचा वेळ खर्ची होतोय.

परीक्षार्थी लटकले
वाहन चालवण्याचे लायसन्स मिळण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीला परीक्षा द्यावी लागते. परंतु आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी वीजपुरवठा बंद पडल्याने परीक्षार्थी रांगेतच उभे होते. प्रशासनाने या ठिकाणी वीजपुरवठा बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.