आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दशकानंतर मिळणार न्हावी गणाला सभापतीपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - जिल्हाभरातील पंचायत समित्यांचे आरक्षण 30 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात काढण्यात आले. या आरक्षणात यावल पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे तब्बल 47 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर न्हावी गणाला सभापतीपदाचा मान मिळणार आहे.

पंचायत समितीच्या स्थापनेच्या वेळी अर्थात 1962 ते 1967 या काळात सभापती पद न्हावी गणाकडे होते. माजी गृहराज्यमंत्री (कै.) जे.टी.महाजन यांनी सर्वप्रथम सभापती पद भूषवले होते. त्यानंतर जवळपास पाच दशकांनी न्हावी गणाला बहुमान मिळण्याचे चिन्हे आहेत. न्हावी गणातून निर्मला फिरके यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून यावल पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होते. साकळी गणाचे प्रतिनिधित्व करणा-या काँगे्रसच्या मासुमाबाई मुक्तार तडवी या विद्यमान सभापती आहेत.

पंचायत समितीत सलग 15 वर्षे भाजपा-सेना युतीची सत्ता होती. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँगे्रसने सत्ता काबीज केली. सद्य:स्थितीत काँग्रेसकडे सहा सदस्य असून यात तीन महिलांचा समावेश आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात मासुमाबाई तडवी यांना राखीव जागेवर पद भूषवले आहे. त्यामुळे उर्वरित काळात न्हावी गणातील निर्मला फिरके यांची निवड होण्याची चिन्हे आहेत. शरद महाजन यांच्या विश्वासू सहकारी म्हणून फिरके परिचित आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्या आरती महाजन यांच्या गटातील असल्याने फिरके यांची निवड निश्चित मानली जात आहे. उपसभापती पद सध्या भालोद गणातील लिलाधर विश्वनाथ चौधरी यांच्याकडे आहे. आगामी काळात उपसभापती पदावर किनगाव गणातील प्रशांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

यांनी भूषवले पद
राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या तेव्हा, 17 सप्टेंबर 1962 रोजी यावल पंचायत समिती सभापती पदी जे.टी.महाजन यांची सर्वप्रथम वर्णी लागली होती. त्यांच्यानंतर व्यंकट पाटील, लिलाधर चौधरी, शशिकांत चौधरी, एकनाथ चौधरी, रमेश चौधरी, मनोहर पाटील, कमलाबाई पाटील, मनोहर पाटील, सुपडू चौधरी, भरत महाजन, शोभा पाटील, सूर्यभान तायडे, अलका जावळे, डॉ.नरेंद्र कोल्हे, विद्यमान मासुमाबाई तडवी यांनी सभापती पद भूषवले आहे.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन
- आरक्षणानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. अद्याप याबाबत कुठलीही हालचाल झालेली नाही. आदेशाचे पालन केले जाईल. मासुमाबाई तडवी, सभापती, यावल पंचायत समिती
- तालुक्याच्या पश्चिम भागाला मासुमाबाई तडवी यांच्या माध्यमातून सभापतीपद लाभले आहे. आरक्षणानुसार तालुक्याच्या पूर्व भागाला फिरके यांच्या निवडीने न्याय देता येईल. त्यादृष्टीने पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. पक्षपातळीवर बैठकीत निर्णय होईल. शरद महाजन, माजी सदस्य, जिल्हा परिषद.