आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'You\', Ghani And \'we\' An Iconic Vrgachi Planned Meeting At A Time Is Not Reached.

‘आप’, गनी और ‘हम’- प्रतिष्ठित वर्गाची नियोजित बैठक ऐनवेळी बारगळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-सामाजिक संस्था आणि कार्यात अग्रेसर असलेले रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गनी मेमन यांच्या पुढाकाराने शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना आकर्षित करण्याचा आम आदमी पक्षाचा प्रयत्न मंगळवारी अपयशी ठरला. परिणामी ‘एलिट क्लास’ची बैठकच पक्षाला रद्द करावी लागली.
पक्षाच्या महाराष्ट्र समन्वयक अंजली दमानिया आणि संजीव साने यांना या वर्गाशी संवाद साधण्यासाठीच खास आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये ‘एलिट क्लास’बरोबर ही बैठक होणार होती. शहरातील रोटरी क्लब आणि अन्य सामाजिक संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, शहरातील व्यापारी हे या बैठकीला उपस्थित राहातील, असे सांगण्यात आले होते. या सर्व वर्गाला सभेसाठीचे आमंत्रण देणे आणि ते बैठकीसाठी येतील हे पाहाणे ही जबाबदारी गनी मेमन यांनी घेतली आहे, असेही सांगण्यात येत होते. त्यामुळे या बैठकीला कोणकोण उपस्थित राहातात, याकडे माध्यमांचेही लक्ष होते.
गनीच गैरहजर
एलिट क्लासच्या बैठकीला उपस्थित राहाता आले पाहिजे म्हणून अंजली दमानिया कारने धावत पळत बैठकीच्या वेळपर्यंत जळगावात पोहोचल्या; मात्र, गनी मेमन हेच बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. चार ते पाच नावे वगळता अपेक्षित वर्गातले कोणीच या बैठकीकडे न फिरकल्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला. पैगंबरवासी सैय्यदना बुर्‍हानुद्दीन यांच्या र्शद्धांजली सभेला जावे लागत असल्यामुळे आपल्याला बैठकीला येता येणार नाही, असा एसएमएस मेमन यांनी या बैठकीचे आयोजक शेखर सोनाळकर यांना पाठवला. त्यामुळे आम आदमी पक्षाकडे या वर्गाला जाता येऊ नये म्हणून नेमकी त्याच वेळी ही सभा आयोजित करण्यात आल्याचे बैठकस्थळी सांगितले जात होते.
‘आप’ नव्हे ‘हम’
गनी मेमन आम आदमी पक्षाच्या पहिल्याच बैठकीला हजर होते. त्यामुळे ते ‘आप’मध्ये जातील, असे मानले जात होते; मात्र त्यांचा ओढा ‘हम’चा नारा देत जाहिराती करणार्‍या कॉँग्रेस पक्षाकडे असल्याचे दिसते आहे. कॉँग्रेसने 10 वर्षांत राबवलेली धोरणे आणि राहुल गांधींमध्ये आलेली प्रगल्भता याविषयी ते उत्साहाने बोलू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते कॉँग्रेसवासी होतील, अशी शक्यता आहे. तथापि, आपल्याला कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉँग्रेसचेही निमंत्रण आले असून दोन्हीपैकी कोणत्या पक्षाचे निमंत्रण स्वीकारायचे याचा आपण विचार करीत आहोत, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
विचार जुळले नाहीत
आम आदमी पक्षाच्या बैठकीसाठी आपणच त्यांना रोटरी हॉल मिळवून दिला; पण सगळ्यांची जबाबदारी घेतलेली नव्हती. मला बैठकीला येता येणार नाही, हेही एसएमएस करून आधीच कळवले होते. मी आम आदमी पक्षात यावे, यासाठी त्यांचा आग्रह होता आणि आहे; पण त्या पक्षाचे विचार माझ्या विचारांशी जुळले नाहीत हे खरे आहे. गनी मेमन, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब
त्यांनी कळवले होते
आम आदमी पक्षाच्या बैठकीच्याच वेळी र्शद्धांजली सभा असल्याने येता येणार नाही, असे गनी मेमन यांनी मला एसएमएस करून कळवले होते. मात्र, त्यांनी डॉ. राजेश पाटील यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली होती. काही व्यापारी आलेही होते. गनी मेमन यांनीही पक्षप्रवेश करावा, यासाठी त्यांना आणखी आवाहन करणार आहे. शेखर सोनाळकर, आम आदमी पक्ष