आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात निवडणूक प्रचार बॅनरने घेतला युवकाचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील एसएमआयटी महाविद्यालयासमोर एकाच इमारतीवर भाजप आणि अपक्ष अशा दोन विरोधकांचे प्रचार बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आपलेही बॅनर याच इमारतीवर झळकावे, या उद्देशाने प्रभाग क्रमांक 11 ‘अ’ आणि ‘ब’मधील राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी तीच जागा नक्की केली. दरम्यान, या जागेवर बॅनर लावत असताना विजेच्या शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, इमारतमालकाने तेथे बॅनर लावण्याची परवानगीही दिलेली नव्हती.

प्रचाराचे बॅनर्स लावण्यासाठी उमेदवारांनी ठेका दिला होता. त्यानुसार ठेकेदाराने काम करणार्‍या तरुणांना जागा दाखवल्यावर दोन जण गच्चीवर जाऊन बॅनर लावत होते; मात्र बॅनरच्या लोखंडी फ्रेमचा जवळ असलेल्या वीजतारांना स्पर्श होताच शरद चौधरी हा 23वर्षीय युवक धक्क्याने जागीच गतप्राण झाला, तर गौरव महाले जखमी झाला. हे दोघे युवक कांचननगर भागातील रहिवासी आहेत. ही घटना घडल्यानंतर ज्या उमेदवारांचे प्रचार बॅनर लावले जात होते त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

इमारतमालकाची परवानगी नाही
या इमारतीच्या मालक एम.व्ही.पटेल या सत्तरीतल्या आजीबाई आहेत. त्यांची मुले सकाळी कामावर निघून गेल्यानंतर बॅनर लावणार्‍यांनी गच्चीचा ताबा मिळवला. तसेच घरातील सदस्यांना न सांगता उमेदवाराने या तरुणांना गच्चीवर पाठवले. 15 बाय 20 आकाराचे मोठे बॅनर लावण्याची कसरत करत असताना गच्चीपासून अगदी दोन फूट अंतरावर असलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श बॅनरच्या लोखंडी फ्रेमला झाला आणि ही घटना घडली. यासंदर्भात ‘आम्हाला न सांगता गच्चीवर बॅनर लावण्याचा प्रय} झाला’ असे पटेल यांचा मुलगा नवीन पटेल यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

परिसरातील लोकांचे सहकार्य
बॅनर लावण्याचे काम सुरू असताना एक उमेदवार आणि ठेकेदार स्वत: इमारतीच्या खालून उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत होते; मात्र शरदला शॉक लागताच त्यांनी तेथून पलायन केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. तसेच दुपारपर्यंत उमेदवाराने रुग्णालयातही हजेरी लावली नव्हती.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
शरदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर दुपारी त्याच्या नातेवाइकांनी उमेदवार तसेच ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी नातेवाईक शहर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र दोन्ही ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला नाही. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. गुन्हा दाखल होत नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र, सायंकाळी 7.30 वाजता मृतदेह ताब्यात घेतला.

दीड महिन्यापूर्वीच झाले शरदचे लग्न
या घटनेत मृत झालेला शरद चौधरी हा कांचननगर भागात भाजीपाला विक्री करणारा गरीब युवक होता. दीड महिन्यापूर्वी याच परिसरातील एका मुलीशी त्याचा विवाह झाला होता. वैवाहिक जीवनाला दोन महिनेदेखील पूर्ण झालेले नसताना शरदवर असा प्रसंग ओढवला. भाजीपाल्याच्या व्यवसायात कष्ट जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे शरदने निवडणूक काळात बॅनर लावण्याचे काम स्वीकारले होते. मंगळवारी प्रथमच तो या कामावर गेला होता. 200 रुपये रोज व दुपारपर्यंत काम आटोपणार असल्याने तो सकाळी लवकर उठून कामाला गेला होता. शरदला दोन बहिणी व एक लहान भाऊ असून, एका बहिणीचे लग्न झाले आहे. तसेच त्याचे वडील हातमजुरी करतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शरदवरच त्याच्या कुटुंबाची भिस्त होती.