आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीः मित्राच्या मदतीने स्वत:च्या घरातून पैसे चोरून केली मजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बेपत्ता होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने स्वत:च्या घरीच हात साफ केला आणि चोरलेल्या पैशातून कपडे, मोबाइल, शूज घेऊन मौजमजा केली. नाशिक येथून पोलिसांनी दोघा मुलांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील देवपूर परिसरातील क्षीरे कॉलनीत राहाणारा 15 वर्षीय साकेत (नाव काल्पनिक) हा शाळेत जात असल्याचे कारण सांगून सोमवारी (दि.22) घराबाहेर पडल होता ; परंतु तो घरी परतला नाही. त्यामुळे तो हरविल्याची नोंद पश्चिम देवपूर पोलिसांत झाली होती. या मुलासोबत अकरावीतील विद्यार्थी सौरभ (नाव काल्पनिक) हादेखील बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तपासात उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी लक्ष घातले होते. तपासादरम्यान दोन्ही विद्यार्थी नाशिकला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काल मंगळवारी रात्री पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले. भद्रकाली परिसरातील सॅप्रान नामक लॉजमधून पहाटे दोन वाजता त्यांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नवीन कपडे, मोबाइल, महागडे बूट तसेच मोठय़ा प्रमाणात रोकड मिळून आली. या दोघांना सकाळी धुळे शहरात आणण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोने खरेदी करणारा राकेश रणधीर (रा. जमनागिरी रोड), जय उर्फ मुन्ना भाईदास दळवी (रा. बुलडाणा) यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघा विद्यार्थ्यांक डून सुमारे एक लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रक रणी या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश गावंडे, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, साहेबराव शेलार, संदीप कदम, रमेश उघडे, भिका चौधरी, सचिन सोनवणे, बालमुकुंद दुसाने, संजय सूर्यवंशी, ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, बुधवारी सकाळी दोघांच्या नातलगांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.


जळगाव-नाशिक प्रवास
दागिने विक्रीनंतर हे विद्यार्थी जळगाव, तेथून चाळीसगाव मार्गे नाशिकला गेले. पोलिसांनी साकेतचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याचे लोकेशन मिळविले. त्यानंतर ते नाशिकला असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, साकेत व सौरभची एका मित्रामार्फत ओळख झाली होती. बुलडाणा येथील दळवी हा लहानमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो. धुळयातील एका चौकामध्ये सौरभ आणि साकेतशी त्याचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बापाची मुलाविरुद्ध तक्रार
याप्रकरणी सौरभच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 379, 411, 141, 34 अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर सौरभ रडत होता. त्याचे नातलगही पोलिस ठाण्यात हजर होते. आपल्या मुलांना दिशाभूल करून हे कृत्य करण्यास भाग पाडल्याचा दावा होत आहे. साकेत आणि सौरभ हे उच्चशिक्षित घरातील आहेत. साकेतचे वडील हे बांधकाम विभागात तर सौरभचे वडील शिक्षक आहेत.

रोख रक्कम, महागडे मोबाइल केले जप्त
साकेतने सात तोळे सोन्याचे दागिने व रोकड लांबविली होती. तथापि त्यांच्याकडून एक लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात दोघा विद्यार्थ्यांकडून 72 हजारांची रोकड, रणधीर याच्याकडून सोने व 50 हजार रुपये तर दळवीकडून पाच हजार रुपये व तीन मोबाइलचा समावेश आहे.