आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल क्लबने घेतला तरुणाचा बळी; नातेवाइकांकडून हॉटेलची तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एमआयडीसीत सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू आहे. या अड्डय़ावर झालेल्या कर्जामुळे मेहरूणमधील रजा कॉलनीतील तरुणाने भारत गॅस परिसरातील चिंचेच्या झाडाला लटकावून गळफास घेतल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी हॉटेलची तोडफोड करीत क्लबचालकानेच या तरुणाचा घातपात घडवून आणल्याचा आरोप केला. याप्रकरणी क्लबचालकासह तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजा कॉलनी परिसरातील व भाजीपाला मार्केटमध्ये हमाली काम करणारा युनूस नबी देशमुख (उर्फ बाबा) हा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी होता. याचदरम्यान एक अज्ञात व्यक्ती घरी आला अन् युनूसला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तो रात्रभर घरी परतलाच नाही. शनिवारी दुपारी अडीच वाजता गोटू नावाच्या व्यक्तीचा युनूसचा भाऊ अनिसला फोनवरून त्याच्या भावाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. तो चटकन परिसरातील काही नागरिकांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळ भारत गॅसजवळ एका शेतात होते. त्याच परिसरात धुडकू सपकाळे याच्या मालकीचा जुगार अड्डा आहे. युनूसचा मृतदेह पुठ्ठा बांधण्याच्या एका प्लास्टिक पट्टीला लटकलेला होता अन् गुडघे जमिनीवरच टेकलेले होते. या प्रकरणी अनिस देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धुडकू सपकाळे, रवींद्र वाघ, राजू भोसले, गोटू यांचेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण परिसरात पळापळ
युनूस याच्या मृत्यूनंतर परिसरात नागरिकांनी गोंधळ घालत दगडफेक केली. रिक्षा व अन्य वाहनांमधून मोठय़ा प्रमाणात लाकडे व दगड वाहून नेले जात होते. या वेळी पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस निरीक्षक नितीन नेहूल यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. धुडकू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी संतप्त नागरिकांनी केली.

खून केल्याचा संशय
युनूस याने आत्महत्या केलेली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. युनूस हा नेहमी याच परिसरातील धुडकू सपकाळे याच्या क्लबवर पत्ते खेळण्यासाठी जात होता. त्याच्यावर धुडकू याचे अडीच ते तीन लाखांचे कर्ज होते व तो वारंवार कर्जाची मागणी करीत होता. यातूनच त्याचा धुडकू सपकाळे याने खून करून नंतर आत्महत्या दाखवली असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

घरातील सामान फेकले
ज्या ठिकाणी युनूसने आत्महत्या केली त्या ठिकाणी धुडकूचा क्लब चालतो. त्याला लागूनच सुमेरसिंग नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलची व रामेश्वर कॉलनीतील त्याच्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. त्याचबरोबर क्लबच्या बाहेर उभ्या मोटारसायकल (क्रमांक एमएच 19 एआर.0770) व लॅण्ड क्रुझर (क्रमांक एमएच31 सीएम 4141)ची देखील जमावाने तोडफोड केली.

सिव्हिलमध्येही गोंधळ
घटनास्थळावरून युनूसचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्यानंतर जमाव सिव्हिलमध्ये आला. त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिस आल्यामुळे अनर्थ टळला.

छायाचित्र - नातेवाईक व संतप्त जमावाशी चर्चा करून शांततेचे आवाहन करताना पोलिस कर्मचारी.