आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या मार्गावरील 6 जणांचे ब्रेन वॉश, व्हॉटसअॅप ग्रुपमध्‍ये होत होत्‍या चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - इसिसच्या मार्गावर असलेल्या धुळ्यातील सहा युवकांचे मन परिवर्तन करण्यात आले. मुंबईतील एटीएसच्या पथकाने धुळ्यात येऊन या युवकांचे ब्रेन वॉश केले. हे सर्व युवक १६ ते १८ वयोगटातील आहेत. अजून चौघांची नावेही या प्रकरणात पुढे येत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे पथकही यासंदर्भात धुळ्याला येऊन गेल्याचे वृत्त आहे.

धुळे, मुजफ्फरनगर आणि दादरी येथील दंगलीमुळे धुळ्यातील या तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती. मग त्यांनी व्हॉटसअॅपवर ग्रुप तयार करून संदेशावर चर्चा सुरू केली. या चर्चेत इसिसपर्यंत पोहोचायचे कसे, पासपोर्ट कसा मिळवायचा, अशी चर्चा त्यांची होत होती. व्हॉटसअॅपवर या चर्चेवर दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) लक्ष गेले. एटीएस पथकाने त्यांच्यावर वॉच ठेवला. इसिसकडे जाण्याच्या मार्गावर हे तरुण असल्याचे लक्षात येताच एटीएसच्या अधिकाऱ्यांनी थेट या तरुणांचे घर गाठले. त्यांच्या पालकांना व मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे ब्रेन वॉश केले. मौलाना गिलानी, एटीएसचे बडे अधिकारी व काही समाजधुरिणांनी अनेक तास बसून या मुलांचा ब्रेन वॉश करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. दरम्यान, शहरातील आणखी चार तरुणांच्या हरकतीवर संशय निर्माण होऊ पाहत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या वर्षाच्या अखेरीस धुळे पोलिसांसमोर हा प्रकार आला.
एनआयएची टीम धुळ्यात
धुळ्यातील काही तरुण इसिसच्या मार्गावर असल्याच्या वृत्तामुळे राष्ट्रीय तपास संस्थेचेही (एनआयए) लक्ष धुळ्याकडे गेले. एनआयएसची टीम काही दिवसांपूर्वी धुळ्यात येऊन गेली. आपल्या स्तरावर चौकशी, नोंदी व तांत्रिक माहिती या पथकाने संकलित केली. तथापि याबद्दल मात्र धुळे एटीएस पथक कानावर होत ठेवते.
दंगलीत लपली कारणे
६ जानेवारी २०१३ रोजी मच्छीबाजार परिसरात घडलेल्या दंगलीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यामुळे एकानंतर एक असे सहा जणांच्या मनात इसिसला जाऊन मिळण्याचे भयानक विचार डोकावू लागले. विचारांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून हे तरुण धुळे, महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेर पडण्याचा विचार करू लागले; परंतु तत्पूर्वीच एटीएसने त्यांना हेरले.
आता खान्देशवर नजर
धुळ्यातील या प्रकारानंतर आता जळगाव व मालेगाव येथील घटनांवरही प्रशासन लक्ष ठेवून आहे. शिवाय खान्देशातील एटीएस पथकालाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील बडे अधिकारी याबाबत खान्देशवर नजर ठेवून आहेत.