आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या शोधासाठी गावकरी रस्त्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तालुक्यातील बोरविहीर गावातील तरुण अचानक बेपत्ता झाला. याबाबत वारंवार पोलिसांना कळवूनही कारवाईला विलंब करणा-या पोलिसांचा निषेध नोंदवित शेकडो गावक-यांनी बुधवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच महामार्गावर काटेरी झुडपे आणि दगडे आडवी लावून वाहतूक रोखल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान तरुणाच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताची शक्यता गावक-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बोरविहीर या गावातील प्रवीण पाटील हा तरुण काल मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास शेतात गेला होता; परंतु दुपारपर्यंत तो घराकडे परतला नाही. तसेच यानंतरदेखील तो कोणालाही आढळून आला नाही. यामुळे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याचे कुटुंबीय शेतात दाखल झाले. या वेळी शेतविहिरीतील वीज मोटार खोललेली दिसून आली. तसेच नट बोल्ट, स्टार्टर, पाइपही पडलेला दिसून आला. तर काही अंतरावर प्रवीणचा बूट कुटुंबीयांना आढळून आला. यामुळे संभ्रम निर्माण होऊ लागला. यानंतर त्याचे मित्र आणि नातलगांकडेही चौकशी करण्यात आली ; परंतु तो मिळून आला नाही. यामुळे सायंकाळी साडेचारच्या सुमारास धुळे तालुका पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळानंतर पोलिस निरीक्षक डी.आर. पाटील आणि त्यांच्या सहका-यांचे पथक दाखल झाले. तोपर्यंत सुमारे साडेतीनशे गावक-यांचा जमाव दाखल झाला होता. सर्वांचा शोध सुरू असतानाही पोलिसांना तो आढळून येत नव्हता. यामुळे गावक-यांनी श्वान पथक मागविण्याची मागणी केली. या मागणीनुसार धुळ्यातून श्वान पथकही मागविण्यात आले. या श्वान पथकाने वनक्षेत्रातून तलावापर्यंत माग दाखविला. दरम्यान, या प्रकारामुळे गावक-यांमधून शंका-कु शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. तोवर सायंकाळ झाल्यामुळे पोलिसांनाही तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र पोलिसांनी सायंकाळीही तलावाच्या सभोवताली शोध घेतला.
यानंतर गावाकडे माघारी फिरलेल्या पोलिसांनी मध्यरात्री साडेअकरा वाजेपर्यंत काही गावक-यांशी चर्चा केली. तसेच तपासासाठी पूरक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बुधवारी सकाळी गावक-यांकडून पुन्हा नव्या जोमाने प्रवीणचा शोध सुरू झाला; परंतु पोलिसांना वारंवार कळवूनही ते दाखल झाले नाही. अशी गावक-यांची तक्रार आहे. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 400 ते 500 जणांच्या जमावाने धुळे-चाळीसगाव रस्त्यावर ठिय्या मांडला. रस्त्यावर काटेरी झुडपे आणि दगडे ठेवून रस्ता अडविण्यात आला. या वेळी बोरविहीरच्या गावक-यांनी रस्त्यावर ठाण मांडून घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डी.आर. पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई सहका-यांसह दाखल झाले. प्रवीणचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यासोबत गावक-यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न झाला. अखेर पाेिलसांच्या आश्वासनानंतर गावक-यांनी आंदोलन मागे घेतले. यादरम्यान पोलिसांकडून प्रवीणचा शोध पुन्हा सुरू झाला होता.
गावक-यांमधील चर्चा - प्रवीण या तरुणाने काही दिवसांपूर्वी शेतातून वीज मोटार लांबविणा-या चोरट्याचे पितळ उघड पाडले होते. त्यामुळे घातपाताची शक्यताही वर्तविली जात होती. उट्टे काढण्यासाठी या तरुणाला बेपत्ता क रण्यात आले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता अशी चर्चा आपल्याही कानावर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गावक-यांची मागणी अन् श्वान पथक पुन्हा दाखल - मंगळवारी सायंकाळप्रमाणे पुन्हा श्वान पथक मागवावे, अशी मागणी गावक-यांकडून करण्यात आली. त्यामुळे बुधवारी दुपारी पोलिसांनी पुन्हा धुळ्यावरून श्वान पथक मागविले. मंगळवारी सायंकाळप्रमाणे या श्वानने प्रवीणच्या शेतापासून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तथापि या वेळीही श्वानाने पुन्हा वनक्षेत्रातून तलावापर्यंत माग काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हातघाईचे कुठलेही पुरावे अद्याप गवसलेले नाही - प्रवीणच्या शेतात हातघाई झाल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. याशिवाय रक्त किंवा इतर बाबीही मिळालेल्या नाहीत. मोटार काढल्यानंतर नट, बोल्ट पुन्हा लावण्यात आले आहेत. यामुळे चोरीचा हा प्रकार असेल असे वाटत नाही. तलावाजवळही अद्याप ठोस पुरवा मिळाला नसला तरी चौकशीतून सत्य समोर येईल. - डी.आर. पाटील, पोलिस निरीक्षक