आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीत आढळला अर्धवट जळालेला युवकाचा मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नेरीनाका येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी वाजता अंदाजे २३वर्षीय अनोळखी युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. स्मशानभूमीचे मुख्य प्रवेशद्वार बंद असतानाही मृतदेह आत कसा आला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, या प्रकारामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीत सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने अशा घटना घडत आहे. त्यामुळे महापािलका प्रशासनाने आता तरी सुरक्षा यंत्रणा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेरीनाका स्मशानभूमीत रविवारी दिवसभरात तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले हाेते. त्यानंतर रात्री १० वाजता कर्मचारी कैलास दयाराम सोनवणे यांनी स्मशानभूमीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. साेमवारी पहाटे वाजता सोनवणे हे ओट्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता १८ क्रमांकाच्या ओट्याच्या शेजारी एका युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर कपडे नव्हते. तसेच त्याला मारून अर्धवट जाळून टाकले असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत होते. सोनवणे यांनी भांबावलेल्या अवस्थेत याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. सकाळी वाजता पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी पंचनामा केला. या युवकाच्या गळ्यात साईबाबाचे चित्र असलेले लॉकेट होते. उजव्या हाताच्या दंडावर दिल आकारात योगिता नाव गोंदलेले आहे. या प्रकरणी शनीपेठ ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास उमाकांत चौधरी करीत आहेत.

स्मशानभूमीचा कारभार रामभरोसे
नेरीनाका स्मशानभूमीत २०१२मध्ये सिव्हिलच्या डॉ. विजया चौधरी यांचा खून करून खोटी नोंद करीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर गेल्या महिन्यातच अस्थींची अदला-बदल झाली होती. त्यानंतरही मनपाने स्मशानभूमीची व्यवस्था सुधारली नाही; किंवा सुरक्षाही वाढवली नाही. तीन कर्मचार्‍यांवर कारभार सुरू आहे. दिवसभरात शेकडो बेवारस लोक स्मशानभूमीत अंघोळ, कपडे धुण्यासाठी येतात. झाडांखाली बसून नशा करतात. त्यांना हटकण्यास येथे सुरक्षारक्षक नसल्याने अशा घटना वाढत आहेत.
युवकाचा खून झाल्याचा संशय
मृतयुवकाच्या अंगात कपडे नव्हते. तशा अवस्थेत तो स्मशानभूमीत कसा पोहचला‌?, मुख्य प्रवेशद्वार बंद असूनही तो आत कसा आला?, आत एखादी व्यक्ती जळत असतानाही स्मशानभूमीच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे युवकाचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. युवकाची ओळख पटल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. तसेच त्याच्यासोबत काय प्रकार घडला आहे, याचीही उकल सध्या झालेली नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तो पर्यंत त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

प्रवेशद्वाराशिवाय चार ठिकाणी भगदाड
स्मशानभूमीचे मुख्य प्रवेशद्वार रात्री १० वाजता बंद होते. मात्र, त्याशिवाय प्रवेशद्वाराला लागूनच दोन कपारी आहेत, तेथून आत प्रवेश करता येऊ शकतो. तसेच नाल्याजवळील लोखंडी गेटच्या आसार्‍याही तोडलेल्या आहेत. बाजूला असलेल्या सॉमिल मधून लाकूड वाहून आणण्यासाठी लोखंडी जाळी कापून बोगदा तयार केला आहे. मागच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाजवळही बोगदा तयार केला आहे. अशा एकूण चार ठिकाणांहून अनधिकृतपणे प्रवेश करता येऊ शकतो. मुख्य प्रवेशद्वाराशेजारी कर्मचार्‍याचे घर आहे. तो कर्मचारी गेट बंद करून घरात असतो. त्यानंतर रात्रभर सुरक्षारक्षक नसतो.