आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे चाेरण्याचा संशय; तरुणाला दिला चोप, वृद्धास मदत करताना गैरसमज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पेन्शनचे पैसे काढण्याच्या बहाण्याने पैसे चोरुन नेत असल्याच्या संशयावरून नागरिकांसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एका तरुणाला चोप दिल्याची घटना शनिवारी दुपारी ११.३० वाजता महाराष्ट्र बँकेसमोर घडली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन हकीकत विचारली असता नागरिकांचा झालेला गैरसमज दूर झाला अन् वादावर पडदा पडला.

 

एक सेवानिवृत्त वृद्ध पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शनिवारी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र बँकेत आले होते. या वेळी त्यांच्यासोबत एक तरुण देखील महाराष्ट्र बँकेत आला होता. मात्र, त्या ठिकाणी वृद्धाचे कुटुंबीय आल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. हा तरुण पेन्शनचे पैसे काढत असताना त्यातून काही पैसे काढून घेत असल्याचा कुटुंबीयांनी या वेळी आरोप केला. या प्रकाराची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी ज्योती शिवदे यांना मिळताच त्यांनी देखील बँक धाव घेतली. त्यांच्यासह नागरिकांनी तरुणास वृद्धाची फसवणुक करत असल्याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला. दरम्यान, बँकेत गोंधळ सुरू असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाना तायडे अजित पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. अखेर गैरसमज दूर झाल्याने पोलिस ठाण्यात हे प्रकरण शांत झाले. तर या प्रकरणी कुणीही तक्रार दिली नसल्याने पाेलिसात याबाबत नोंद करण्यात अाली नाही. 

 

यामुळे झाला गैरसमज 
पाेलिसांनी तरुणाची विचारपूस केली असता त्याने संपूर्ण हकीकत सांगत चहाच्या बिलाचे ३०० रूपये घ्यावयाचे असल्याने वृद्धास पैसे काढण्यास मदत करत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मारहाण केली, असे त्या तरूणाने पोलिसांना सांगितले. या प्रकारामुळे बँक परिसरात माेठी गर्दी जमली होती. 

बातम्या आणखी आहेत...