आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, दोन संशयित महिलांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - किरकोळ कारणावरून चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजीव गांधीनगरातील युवकाचा मुंबईला उपचारासाठी नेत असताना नाशिक येथे गुरुवारी रात्री १२.३० वाजता मृत्यू झाला. यामुळे शुक्रवारी सकाळपासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. 
 
राजीव गांधीनगरातील राहुल प्रल्हाद सकट (वय २५) हा बुधवारी रात्री १० वाजता घरी जेवण करीत असताना सत्यासिंग मायासिंग बावरी,रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मलिनसिंग मायासिंग बावरी,रवींद्रसिंग मायासिंग बावरी, मालासिंग मायासिंग बावरी,कलाबाई मायासिंग बावरी यांनी सकट कुटुंबीयांवर हल्ला केला होता. त्यात सत्यासिंग याने राहुलच्या डाव्या बरगडीवर चाकूने वार केल्याने त्याचे आतडे बाहेर पडले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवले होते. डॉक्टरांनी चार शस्त्रक्रियेसाठी लाख रुपयांचा खर्च येईल, असे सांगितल्याने गुरुवारी दुपारी वाजता जळगाव येथून त्याला मुंबईला उपचारासाठी नेत होते. 

अंत्यसंस्कार करण्यास नकार 
नाशिक येथून शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता राहुलचा मृतदेह आणला. नागरिकांनी रामानंद घाटात रुग्णवाहिका थांबवून मृतदेह राजीव गांधीनगरात आणला. नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यांना पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.जी.रोहम यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मांग गारुडी समाजाचे नेते ब्रम्हा हातगडे शिवलाल लोंढे यांच्याशीही चर्चा केली. आग्रा येथून नातेवाईक आल्यानंतरच शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 

संशयिताला तडीपार करणार : याहल्ला प्रकरणात मालासिंग बावरी कलाबाई बावरी या दोन महिलांना अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर वाढीव कलम लावण्यात येईल. तसेच मुख्य संशयित सत्यासिंग याच्यावर तडीपारीची कारवाई करण्याचे आश्वासन सांगळे यांनी नातेवाइकांना दिले. 
सह्यांचीमोहीम : संशयितसत्यासिंग याने यापूर्वी चार जणांवर हल्ला केला आहे. भंगारच्या व्यवसायाआड चोऱ्या करण्याचा त्यांचा धंदा असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यांना दुसरीकडे हलवण्यात यावे, या मागणीसाठी युवकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. ५०० नागरिकांनी सह्या केल्या. 

सहा महिन्यांनी होणार होते राहुलचे लग्न 
राहुल हा मनपाच्या ठेकेदाराकडे मजुरीचे काम करीत होता. त्याचे वडील प्रल्हाद सकट यांचे निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई म्हाळसाबाई, बहीण सुरेखा आणि भाऊ अजय असा परिवार आहे. गेल्या वर्षी त्याचा साखरपुडा झाला होता. सहा महिन्यांनी लग्न होणार होते. 

घरात विद्युत प्रवाह सोडून पसार 
राजीव गांधीनगर भागातील शिकलकरी समाजाच्या नागरिकांनी घटनेनंतर इतरत्र पलायन केले. तसेच काही समाजकंटकांनी एका घरात विद्युत प्रवाह सोडला होता. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने वायरमनला बोलावून विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...