आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेने तरूणाचा जागीच मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेने 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 3.30 वाजता जळगाव-भुसावळ रोडवरील दादाजी धुनीवाले आश्रमासमोर महामार्गावर घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कुंदन पांडुरंग अत्तरदे असे असून, संजय मायाराम आरसे (वय 27) हा जखमी झाला आहे. कुंदन शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी होता.
कुंदन हा शहरातील शंकररावनगर (गीता पार्क) येथील, तर संजय नशिराबादचा रहिवासी आहे. दोघेही इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करीत होते. रविवारी दुपारी नशिराबाद येथून फिटिंगचे काम करून दोघेही दुचाकीने (क्र.एमएच-19/बीडी-7392) जळगावकडे येत असताना खेडीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. तसेच जखमी संजयला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सायंकाळी 6.30 वाजता शवविच्छेदन करून कुंदनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक नीता मांडवे यांनी घटनास्थळी जाऊन व जखमी संजयकडून अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. महामार्गावर सलग दुसर्‍या दिवशी दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
एकुलता मुलगा गमावला
कुंदन हा त्याच्या माता-पित्यांचा एकुलता मुलगा होता. त्याला एक लहान बहीणही आहे. त्याचे वडील पांडुरंग अत्तरदे हे मेरिको कंपनीत कर्मचारी आहेत. दुपारी 3.30 वाजताच त्यांची ड्यूटी सुरू झाली होती व त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ आपल्या सहकार्‍यांसह सामान्य रुग्णालय गाठले. कुंदन गेल्या वर्षी काही विषय नापास झाल्यामुळे नियमित शिक्षण घेत नव्हता. तसेच फावल्या वेळेत वडिलांना मदत म्हणून तो इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करीत होता. सामान्य रुग्णालयात जमलेल्या त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते.
ओव्हरटेकच्या नादात धडक
अपघातातील जखमी संजयने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक समोरून भरधाव येत होता. शेजारच्या ट्रकला ओव्हरटेक करीत असल्यामुळे ट्रकचालकाने वेग कमी न करता दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात कुंदनचा उजवा हात आणि फासळ्यांना जबर दुखापत झाली. दोघेही दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले गेले. तसेच डोक्यालाही मार लागल्यामुळे कुंदनचा जागीच मृत्यू झाला.