आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब रही ना वो बात तो क्या हुआ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - युवारंग महोत्सवात आयोजित सुगम गीतगायन स्पर्धेत तालासुरांची छान गट्टी जमली. हिंदी मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा पेश करण्यात आला. युवकांनी सादर केलेल्या सुगम गीतांनी आणि गझलेने स्पर्धेत चांगलीच रंगत आणली. त्यांना उपस्थित श्रोत्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटाने उत्स्फूर्त दाद दिली. ‘अब रही ना वो बात तो क्या हुआ...’ ही गझल भाव खाऊन गेली.

युवरंगाचा दुसरा दिवस गीतगायनासह नृत्याविष्काराने चांगलाच गाजला. गीतगायन स्पर्धेत ४८ महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी नोंदणी केली होती. या वेळी नोंदणी केलेल्या बहुतांश स्पर्धकांनी सादरीकरण केले. त्यांनी तबला आणि पेटी या वाद्यांसह सुगम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. एकापेक्षा एक सरस गीतांची मेजवानी उपस्थितांनी या वे‌ळी अनुभवली. ‘जनी निर्जनी तुझा पाय रोवलेला... तुझी खूण नाही एैसा गाव तरी कोणता रे... कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य-चंद्र तारे...’ ते ‘सूर ऐकता माझ्या मनी उमले क्षणी हळुवार गीत का...?’ ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ अशा गीतांचे प्रारंभी सादरीकरण झाले.

‘साजनपरगावा गेला गं बाई...’
एका स्पर्धक विद्यार्थिनीने सादर केलेल्या ‘साजन परगावा गेला गं बाई’ या गीताला उत्स्फूर्त दाद मिळाली. ठेवणीतला आवाज त्याला तबला-पेटीच्या साथीचा संगम जुळून आला होता. गेय आणि तितकेच श्रवणीय असलेले हे गीत मनभावन होते. या गीताचे बोल होते...
‘रात सरते दिवस सुना गं बाई, साजन परवागा गेला गं बाई...
कशी गत झाली तेही कळेना, जवळ नसे राया आज...
मिरगाचा छिडकावा बरसत गेला, घरधनी नाही सुना गं वाडा...
कुठल्या मुलकी तुम्ही गेला हो...
कुणी म्हटलं ऱ्हावा...’
जखमी दिलांना भावणारी गीते
उत्तरोत्तरएकापेक्षा एक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. हृदयातील जखमांना ताजे करण्याचे कामही काही गीतांनी केले. तसेच अनेकांच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘इतना प्यार मुझे ना देना..’, ‘दुख के बोल ना सह पाऊॅं...’ यासारखी जखमी दिलांना आपलीशी करणारी गाणीही सादर झाली.

‘दर्दके रिश्ते’ने आणला वेदनेला मोहर
धनाजीनाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने ‘दर्द के रिश्ते’ ही हिंदी गझल सादर सादर केली. गझलेला लागणारा आवाज, चढ-उतार, विश्रांती या सर्वच बाजूंमुळे त्याचे सादरीकरण उत्कृष्ट झाले. त्याची गझल ऐकताना गझलसम्राट भीमराव पांचाळे यांची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. ‘दर्द के रिश्ते ना कर डाले बेकल कही, खो गई इस साल भी कुछ बस्तीयांॅ जलथल कही...प्यासे हम मर गये, रोता रहा बादल कही...’ असे या गझलेचे बोल होते. या गझलमुळे अनेकांच्या वेदनेला मोहर आला.

विरहकांत प्रेयसीचे आर्जवही प्रभावी...
यागझले द्वारे सादर केलेले विरहकांत प्रेयसीने प्रियकराला केलेले आर्जवही मोठे प्रभावी ठरलेे. यात प्रियकर आणि प्रेयसीमधील विशेष प्रेमभंगाचा भावबंध प्रकट झाला. ‘बोलले होते कधी ऐक माझी कहाणी, का तुझ्या डोळ्यांत आले कारणावाचून पाणी, ही कहाणी तुझ्याच बहाण्यांची, तापलेल्या अधीर पाण्याची, नाव घेता तुझ्या दीवानीचे, काळजी घे जरा उखाण्यांची...’ असे या गझलेचे बोल होते.

सूरतेची छेडीता...
युवारंग महोत्सवात स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सादरीकरणाबरोबर इतर स्पर्धकांच्या कार्यक्रमांनाही हमखास हजेरी लावली. त्यांनी इतर स्पर्धकांना चांगलीच दाद दिली. त्यामुळे युवकांचा हा महोत्सव खऱ्या अर्थाने निकोप होत असल्याचे यातून दिसून येत आहे. यात सहभागी प्रत्येक स्पर्धकाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सुगम गायन,भारतीय लोकगीत,पाश्चात्य समूह गीतांचे दमदार सादरीकरण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात फिरताना युवकांच्या ओठी पुन्हा तेच सूर छेडले गेले. यात विशेषत: विद्यार्थिनींनी साजन परगावा गेला गं बाई..., बोलले होते कधी ऐक माझी कहाणी... ही गीते गुणगुणत होत्या. ‘अब रही ना वो बात तो क्या हुआ... इतना प्यार मुझे ना देना...’ आदी गझला विद्यार्थ्यांच्या ओठांवर रुंजी घालत होत्या. त्यामुळे यातून स्पर्धकांच्या सादरीकरणाचे यश दिसून आले.