आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श उपक्रम, युवा शक्ती फाउंडेशनने बुजवले रस्त्यावरील खड्डे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लहान-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत असलेले शिरसोली रस्त्यावरील दीड किलोमीटर अंतरातील खड्डे युवा शक्ती फाउंडेशनतर्फे बुधवारी बुजवण्यात आले. त्यासाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च करण्यात आले. दरम्यान, शहरातील नागरिकांनी त्यांच्या भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढे यावे. फाउंडेशनही त्यात सहभागी होईल, असे आवाहन युवा शक्तीतर्फे करण्यात आले आहे.
शिरसोली रस्त्यावर पडलेल्या लहान-माेठ्या खड्ड्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने युवा शक्ती फाउंडेशनने रस्ते दुरुस्तीचे जाहीर आवाहन केले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी या रस्त्यावरील रमेश जैन यांच्या बंगल्यापासून ते श्रीकृष्ण लाॅन्स या दीड किलोमीटर अंतरातील अनेक खड्डे चार मजुरांच्या मदतीने बुजवण्यात आले.
त्यासाठी १२ हजार रुपये खर्च आला. त्यातून पाच गाेण्या सिमेंट, रेती खडी आदी वापरण्यात आले. या खर्चाचा अर्धा भार धान्य व्यावसायिक माजी नगराध्यक्ष विजयकुमार वाणी यांनी, तर उर्वरित खर्च फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे उचलला. बुजवण्यात आलेले खड्डे सिमेंट, खडी रेतीने भरलेले असल्याने त्यावर काही दिवस पाणी मारणे आवश्यक असते. ते टाकण्याची जबाबदारी या परिसरात सुरू असलेल्या बांधकामावरील सुपरवायझर सचिन भाेळे यांनी घेतली आहे.
विकासकामे थांबल्याने निवडला पर्याय
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शहरातील अनेक विकासकामे थांबली आहेत. त्यावर पर्याय म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात अनेक भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे निधी संकलन करून ही समस्या सोडवण्याची तयारी दाखवल्यास त्यात फाउंडेशनचाही सहभाग राहील, असे विराज कावडिया अमित जगताप यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
यांनी केले श्रमदान
युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, श्वेता चौधरी, प्रतीक पांडे, पृथ्वी मैनपुरी, सुमंत माळी, भूषण साेनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, विनोद बाविस्कर, समीर कावडिया, मनजित जांगीड, सागर जगताप, विपीन कावडिया, अनुराग शर्मा, साैरभ चतुर्वेदी संदीप सूर्यवंशी यांनी श्रमदान केले.
बातम्या आणखी आहेत...