आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शनाने होतेय शांतता भंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर कर्जबाजारी झाल्यामुळे रजा कॉलनीतील युनूस देशमुख याने शनिवारी आत्महत्या केली. त्यानंतर उमटलेले पडसाद अन् घडलेल्या घटना या शांत जळगावच्या सामाजिक सुरक्षिततेला धोका पोहचविणार्‍या अशाच आहेत. पोलिस आपल्या पातळीवर योग्य कारवाई करीत असताना नेमके त्याचवेळी करण्यात आलेले अनावश्यक शक्तिप्रदर्शन कशासाठी होते हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करणारा आहे.

युनूस देशमुखच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी संशयिताच्या हॉटेल, गाडी आणि घरातील सामानाचे नुकसान करण्यात आले. घरातील प्रिय व्यक्ती कर्जाला कंटाळून स्वत:ला संपवून घेते त्यावेळी अशी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. मात्र जो प्रकार तेथे सुरू होता, तो अत्यंत धोकेदायक व निंदणीय असाच होता. स्थानिक पुढार्‍यांकडून कोणत्याही घटनेचे राजकारण करीत अशा पद्धतीने शक्तिप्रदर्शन करणे हे शहराच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे व गंभीर असेच आहे. अपघात किंवा कुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर गर्दी जमवून गोंधळ करणे हा प्रकार जळगावात दिवसेंदिवस वाढत आहे. असले प्रकार जळगावची शांतता धोक्यात येत असल्याचीच सूचना देत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाला आतापासूनच सावध राहणे गरजेचे आहे. गोंधळामुळे ज्याचा कोणत्याही घटनेशी संबंध नाही अशा सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

सोशल क्लबचे शहर
जळगाव शहर सध्या ‘सोशल क्लब’चे शहर या नवीन नावाने ओळखले जाऊ लागले आहे. शहरात 20 पेक्षा अधिक सोशल क्लब आहेत. हे परवाने त्यांनी अवैध धंदेचालकांना भाड्याने दिलेले आहेत. या परवान्यांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी क्लब चालविले जातात. या सर्वच ठिकाणी बिनधास्तपणे जुगाराचे अड्डे सुरू असून हेच अड्डे सामान्य नागरिकाला कर्जाच्या खाईत लोटत आहेत. क्लबमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी जुगार खेळण्यासाठी मात्र कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

पोलिस प्रशासन हतबल
रेल्वे स्थानक ते जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर हे अड्डे सर्रास सुरू आहेत. या क्लबवर कारवाई करताना पोलिसांचे हात देखील आखडतात. पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी असताना तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक लगड यांच्या पथकाने 25 सोशल क्लबवर एकाच वेळी कारवाई केली होती. यात लाखोंचा ऐवज जप्त करून हे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर अद्याप या क्लबवर कोणतीही मोठी कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही.