आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेनेने रोखला मनसेकडे वळणारा लोंढा; अमोल कीर्तीकर यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- युवासेना केवळ निवडणुकांच्या फायद्यासाठी स्थापन झालेली नाही. युवासेनेची ध्येयधोरणे, संघटनात्मक बांधणी पाच तत्त्वांवर आधारित आहे. त्याचा फायदा मुंबईत झाल्याचे सांगतानाच मनसेकडे जाणारा युवकांचा लोंढा थांबविण्यात युवासेनेला यश मिळाले. ही परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्येही पाहायला मिळत असल्याचे मत युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावात निवडीसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची माहिती त्यांच्याच शब्दात.

> युवासेनेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय. जळगाव लोकसभा मतदारसंघातील मुलाखती झाल्या. पुढील महिन्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेण्यात येतील. युवासेना राजकीय, सामाजिक, विद्यार्थी, रोजगार आणि कला, क्रीडा या पाच प्रकारांत विभागली असून, प्राधान्याने शिक्षण आणि वय या गोष्टींवर अधिक भर आहे.

>संघटनेत प्रत्येकाच्या गुणाला वाव मिळेल. प्रमुख पद निवडल्यानंतर कार्यकारिणीतील सदस्यांचे कलागुण ओळखून त्यांच्यावर त्यानुसार जबाबदार्‍या निश्चित करून दिल्या जातील, जेणेकरून सेनेची बांधणी सर्वसमावेशक असेल.

> विद्यार्थी सेनेसोबतच युवासेना स्वतंत्र वेगळी शक्ती करण्याचा मानस आदित्य ठाकरे यांचा आहे. त्यामुळे विद्यार्थी सेना सुरूच राहणार आहे; पण आगामी काळात युवासेनेचा रोल प्रभावी ठरणार आहे. त्या दृष्टीने युवकांची बांधणी सुरू आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून निवडीचे सूत्र हलविले जात आहेत.

> आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत युवासेनेचा महत्त्वाचा रोल असेल; पण केवळ निवडणुका म्हणून घाईघाईने कुठल्याही हालचाली होणार नाहीत. भविष्यातील युवा डोळ्यासमोर ठेवूनच संघटनात्मक कार्य केले जाणार आहे.

> मुंबईत युवासेनेला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेलेले युवक आजही या सेनेकडे वळतानाचे चित्र आहे. मनसेकडे जाणारा युवक वर्ग रोखण्याचे यश युवासेनेला जाते. जळगावातही मनसेकडे गेलेले युवक सेनेमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

> युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांचा राज्य दौरा 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ‘युवा संवाद’ म्हणून ते प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी चर्चा करणार आहेत. विभागनिहाय त्यांचा दौरा असेल. त्यानंतर आगामी काळातील रणनीती निश्चित होईल.