आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनक्रांतीची भूमिका कुणाच्या मूळावर ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे आणि आमदार सुरेशदादा जैन यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने सारी ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदारपूत्र मनीष जैन यांच्या पाठीशी उभी केली होती. केवळ शिवसेनेच्या मदतीमुळे मनीष यांना आमदारकी मिळाली. या आमदारकीचा शिवसेनेच्या वाढीसाठी काहीही फायदा झालेला नाही. त्यातल्या त्यात आता आमदार मनीष जैन यांनी जनक्रांती आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये घालमेल आहे. सेना-भाजपची युती झाल्यास प्रत्येक ठिकाणी युतीचा अथवा युती न झाल्यास प्रत्येक गटात शिवसेनेचा उमेदवार राहणार आहे. अशावेळी जनक्रांतीचा उमेदवाराच्या माध्यमातून आमदार मनीष जैन यांची भूमिका सेनेच्या विरोधातच राहण्याची शक्यता असल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.
ग्रामीण भागाच्या सत्ताकारणात जिल्हा परिषदेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. येथील सत्ताधा-यांच्या हातात ग्रामीण भागाची नाडी एकवटलेली असते. दोन पंचवार्षिकपासून जिल्हा परिषदेची सत्ता भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात आहे. या दोन्ही निवडणुका स्वतंत्रपणे लढून सेना-भाजपने नंतर सत्तेसाठी युती केलेली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीपेक्षा आता सेना-भाजपमधील दरार वाढली आहे. विधानसभेत उपनेते गुलाबराव पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्याने शिवसेना तेव्हापासून आक्रमक झाली आहे. तर विधान परिषदेत भाजप उमेदवार तथा आमदार खडसे यांचे सुपूत्र निखिल खडसे यांचा पराभव केवळ शिवसेनेमुळेच झाल्याने भाजपच्या मनातही असंतोष आहे. मात्र, या दोघांच्या वादातून ज्या सेनेच्या सहकार्याने मनीष जैन यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणे सोपे झाले, त्या आमदार जैन यांनी जनक्रांतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या हालचाली अनेक ठिकाणी भाजपप्रमाणेच शिवसेनेला पराभवाच्या खाईत लोटणा-या ठरू शकतात.
नगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेचे झाले नुकसान? - शिवसेनेच्या माध्यमातून आमदारकी मिळाल्यानंतर पक्षवाढीसाठी मनीष जैन यांचे सहकार्य मिळेल, असा काही नेत्यांचा तसाच पदाधिका-यांचा कयास होता. मात्र, अपक्ष असल्याने मनीष जैन यांनी भाजप व अन्य अपवाद वगळता सर्वच राजकीय व्यासपीठांवर हजेरी लावली. पालिका निवडणुकीत ते सक्रिय झाले, मात्र, ते सुद्धा कुठे खान्देश विकास तर कुठे जनक्रांती आघाडीच्या माध्यमातून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झाल्यास विजय मिळो अथवा पराभव किमान पक्षाचे अस्तित्व कायम राहते. मात्र, आघाडीच्या माध्यमातून लढल्याने आता रावेर, यावल, भुसावळसारख्या महत्त्वाच्या पालिकांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व शून्य आहे.
गॉडफादरच्या विरोधात भूमिका ? - शिवसेनेचे नेते आमदार सुरेशदादा जैन हेच आपले राजकीय गॉडफादर असल्याची कबुली आमदार मनीष जैन यांनी अनेकदा ते सुद्धा जाहीरपणे दिलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार सुरेशदादा यांनी सर्वच 68 जागांवर शिवसेनेचे उमेदवार असावेत, ही भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषद घेवून त्यांनी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे मनीष जैन आपल्या राजकीय गॉडफॉदरची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना जनक्रांतीचे उमेदवार उभे करून भाजपला अडचणीत आणतील की शिवसेनेला अशी चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे.
भाजपला अडचणीत आणण्याची खेळी - शिवसेना-भाजपची युती झाली किंवा न झाल्यास जनक्रांतीच्या माध्यमातून भाजपला अडचणीत आणण्याची खेळी शक्य आहे. जनक्रांतीचे सर्वाधिक उमेदवार जामनेर आणि रावेर, भुसावळ विधानसभा क्षेत्रात असतील. युती झाली तरी या तिन्ही ठिकाणी भाजपचेच उमेदवार जास्त राहणार आहेत. अशा ठिकाणी भाजपला अडचणीत आणण्यासाठी जनक्रांतीला रसद पुरवठा, असे आदेश स्थानिकांकडून सेनेला मिळू शकतात, हा प्रकार आमच्यासाठी परीक्षा पाहणारा ठरू शकतो, अशी माहिती एका जबाबदार कार्यकर्त्यांनी खासगीत दिली.
जनक्रांतीचे 12 ते 15 उमेदवार शक्य - जनक्रांतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 12 ते 15 गटांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सेना-भाजपची युती झाल्यास दोघांचे मिळून 68 उमेदवार असतील. असे झाल्यास जनक्रांतीच्या उमेदवारांचा सामना युतीसोबत होईल. मात्र, सेना आणि भाजप जर स्वतंत्रपणे लढल्यास दोघांचे प्रत्येक ठिकाणी 68 उमेदवार असतील. त्यामुळे सेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस अशा लढतीत जनक्रांतीचाही समावेश होईल. ज्या शिवसेनेच्या मदतीमुळे जनक्रांतीच्या नेत्यांना आमदारकी मिळाली ते नेते जनक्रांतीचा प्रचार करता शिवसेनेविषयी कोणती भूमिका घेतील, याकडे लक्ष आहे.
आघाडी नाही, युतीला प्राधान्य - जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी युती करण्याबाबत प्रयत्नशील आहोत. कोणत्याही स्थितीत आघाडी अथवा दुस-या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार नाही. कारण सेनेचे खेड्यापाड्यात विशिष्ट मतदार आहेत. आघाडीकडून लढल्यास हे मतदान मिळणार नाही. जिल्ह्यातील नेत्यांनी कितीही सांगितले तरी शिवसैनिक आघाडीविषयी अनुकूल नाहीत. वरिष्ठांना याबाबत माहिती दिलेली आहे. - सुकदेव निकम, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
नेमका विरोध भाजप की राष्ट्रवादीला ? - विकासाच्या राजकारणाच्या गोष्टी करताना आमदार मनीष जैन यांनी आमदार सुरेशदादा जैन यांच्या माध्यमातून शक्य तिथे भाजप, राष्ट्रवादीला विरोध केला. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ते शिवसेनेच्या बाजूने भूमिका घेतील, असा अंदाज आहे. मात्र, जनक्रांतीच्या जिल्हा परिषदेसाठी हालचाली पाहता राजकीय त्यांच्या विरोधकांमध्ये शिवसेनेची भर पडू शकते. तर दुसरीकडे कॉँग्रेसबाबत जनक्रांतीकडून एकदाही तीव्र विरोधाचे सूर निघाल्याने, राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करताना जनक्रांतीचा नेमका विरोध कुणाला? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.