आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगाव-डांभूर्णी गटात चुरसीचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यावल तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवार निवडून आणण्यासाठी तालुकास्तरावरील पदाधिका-यांनी आपले राजकीय डावपेच आखले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्युहरचना तयार केली जाते आहे.
किनगाव - डांभूर्णी गट सर्वसाधारण आहे. या गटात काँग्रेसतर्फे जिल्हा बँकेचे संचालक आर.जी.पाटील तर भाजपतर्फे सेवानिवृत्त सहायक आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. दोघा तगड्या प्रतिस्पर्धींमुळे या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सावखेडा - हिंगोणा सर्वसाधारण गटात आमदार शिरीष चौधरींचे समर्थक तथा भाजपचे जिल्हा परिषद माजी सदस्य भरत महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील तर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील किंवा शेखर पाटील यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. न्हावी सर्वसाधारण स्त्री राखीव गटात काँग्रेसतर्फे विद्यमान सदस्य शरद महाजन यांच्या पत्नी आरती महाजन तर भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान सभापती डॉ. नरेंद्र कोल्हे यांच्या पत्नी सुवर्णा कोल्हे किंवा माजी सदस्या प्रतिभा चोपडे यांच्यात सरळ लढत शक्य आहे. दहिगाव - साकळी गटात काँग्रेसतर्फे साकळीच्या पहिल्या महिला सरपंच विद्या महाजन तर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी किरण महाजन यांच्या आई पुष्पा महाजन इच्छुक आहेत. साकळीच्या महाजन परिवारातील एकास उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. भारतीय जनता पक्षातर्फे भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या पत्नी शीतल पाटील किंवा माजी सभापती शोभा पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. भालोद - पाडळसे गटात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे आणि भाजपचे पी. एम. कोळी यांच्यातही सरळ लढतीची शक्यता आहे.
तीन अर्ज दाखल - नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुस-या दिवशी किनगाव - डांभूर्णी गटात काँग्रेसचे आर.जी.पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले. तर पंचायत समिती गणातून काँग्रेसचे प्रशांत पाटील आणि भालोद गणातून नारायण शशिकांत चौधरी यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे पंचायत समिती निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांना मनासारखा तगडा उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. साकळी गणात विद्यमान जिल्हापरिषद सदस्यांची मुलगी उमेदवार असल्यास काँग्रसेच्या गटाचे उमेदवार ठरणार आहे.