आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता दिसताच पटेल-पाटील गट पुन्हा भंगले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून कॉँग्रेसमधील जवाहर आणि अँकर गटातील दरी वाढली आहे. आमदार अमरीशभाई व रोहिदास पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. परिणामी पालकमंत्र्यांसमोरही दोघांचे रुसवे-फुगवे कायम असल्याचे दिसून आले. दोघांचा एकमेकांशी असलेला अबोला कायम आहे. त्यामुळे पालकमंत्री सुरेश शेट्टी व मंत्री नसीम खान यांच्यासोबत दोघा नेत्यांची बैठकही वेगवेगळी झाली.

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि.30) निवड होणार आहे. या निवडीसाठी कॉँग्रेसमधील दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्ष निवडीपूर्वी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी हे शुक्रवारी शहरात आले होते. सकाळी कॉँग्रेस भवनात नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुलमोहोर विर्शामगृहात त्यांनी दोन्ही गटांचे नेते, सर्मथक आणि सदस्यांचे अध्यक्षपदाबाबत म्हणणे ऐकून घेतले. याप्रसंगी आमदार अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार योगेंद्र भोये, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साक्री तालुकाध्यक्ष पोपटराव सोनवणे, किसान कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर गर्दे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, कुणाल पाटील, डॉ.दरबारसिंग गिरासे, राजेंद्र देसले यांच्यासह चारही तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, नवीन सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी नसीम खान, सुरेश शेट्टी यांनी प्रत्येकाशी व्यक्तिगत चर्चा करून अध्यक्षपदाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. त्यामुळे शासकीय विर्शामगृहावर कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. बंद खोलीत चर्चा झाल्याने नेमकी काय बोलणी झाली हे समजू शकले नाही.

पांझरेत पटेलांशी तर तापीत पाटलांशी चर्चा
अध्यक्षपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आलेले पक्षनिरीक्षक नसीम खान व पालकमंत्री सुरेश शेट्टी यांनी गुलमोहोर शासकीय विर्शामगृहात असलेल्या पांझरा या दालनात आमदार अमरीशभाई पटेल यांच्याशी चर्चा केली. तर तापी दालनात रोहिदास पाटील यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान, दोन्ही गटांमध्ये समेट घडवण्यासाठी पालकमंत्री सुरेश शेट्टी, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवाजी दहिते हे एका दालनातून दुसर्‍या दालनात जाऊन नेत्यांशी चर्चा करीत असल्याचे चित्र विर्शामगृहात पाहण्यास मिळाले.

अध्यक्षपदावर पटेल गटाचा दावा
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला 30 जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. त्यातही साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातून आमदार पटेल यांचे सर्मथक असलेले सदस्य निवडून आले आहेत. त्यांची संख्या 21 आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर आमदार अमरीशभाई पटेल गटाकडून दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे धुळे तालुक्यातील 9 जागांवर माजी मंत्री पाटील सर्मथक विजयी झाले आहेत. त्यांनी अध्यक्षपदासह दोन सभापतिपदाची मागणी केल्याने दोन्ही गटातील मतभेद पुन्हा स्पष्ट झाले आहेत.

निर्णय हायकमांड घेईल
सर्वच नेते, नवीन सदस्य आणि पदाधिकार्‍यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबतचे मत, भावना त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेतल्या आहेत. त्याबाबतची माहिती पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना दिली जाईल. कॉँग्रेस पक्षात सर्व निर्णय हे हायकमांडकडून घेतले जातात. त्यामुळे अध्यक्ष कोणाला करावयाचे याचाही निर्णय हायकमांड घेतील. नसीम खान, निरीक्षक, कॉँग्रेस पक्ष

पाटलांनी पटेलांशी बोलणे टाळले
सकाळी 11 वाजेपासून विर्शामगृहात कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत असताना रोहिदास पाटील गटातील मधुकर गर्दे यांच्यासह इतरांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता रोहिदास पाटील हे विर्शामगृहात आले. त्या वेळी पांझरा दालनात आमदार पटेल बसले होते. त्याच ठिकाणी पालकमंत्री सुरेश शेट्टी होते. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी रोहिदास पाटील आले ; परंतु त्यांनी आमदार पटेल यांच्याबरोबर बोलणे टाळल्याने त्यांच्यातील मतभेद किती ताणले गेले आहेत हे उपस्थित पत्रकारांच्या नजरेतून सुटले नाही.

राष्ट्रवादीचे सहकार्य घेणार
कॉँग्रेसमधील वादाबाबत कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. त्यात गत लोकसभा निवडणूक आणि मागील अडीच वर्षांच्या काळातील जिल्हा परिषदेतील सत्तेत असताना रोहिदास पाटील गटाकडून निधीसह जो प्रकार केला गेला त्यामुळे नाराज झालेल्या आमदार पटेल गटाने जिल्हा परिषदेतील सत्तेपासून रोहिदास पाटील गटाला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घेऊन त्यांना सभापतिपद देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे कार्यकर्त्यांमधून सांगितले जात होते.

राष्ट्रवादीतर्फे बिनशर्त पाठिंबा
जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेसविरुद्ध उमेदवार उभे करणारे आणि कॉँग्रेसच्या नेत्यांवर टीका करणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सात सदस्य निवडून आले आहेत. याच राष्ट्रवादी कॉँग्रेसने कॉँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यासंदर्भातील लेखी पत्र माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पालकमंत्री सुरेश शेट्टी यांना सोपवले.