आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद - प्राथमिक आरोग्य केंद्रातील करार कर्मचा-यांच्या नियुक्तीचा वाद चिघळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करार तत्त्वावर कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंटच्या नियुक्तीचा वाद चिघळला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कर्मचारी कामावर जात नसल्याने ऑनलाइन डाटा एन्ट्रीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबईतील इगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड प्रायव्हेट सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंटची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य अधिका-यांच्या आदेशान्वये करार कर्मचा-यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करून घेण्यात आले. या कर्मचा-यांनी मार्च ते जूनदरम्यान नियमित काम केले. त्यानंतर इगल सर्व्हिसेस व आरोग्य संचालनालयामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक वादामुळे कंपनीने कला आणि वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या कर्मचा-यांना कामावरून कमी केले. त्याचबरोबर मार्च महिन्यांपासून वेतनही दिले नाही. याविषयी काही दिवसांपूर्वी कर्मचा-यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले. त्यानंतर कंपनीच्या एका प्रतिनिधीने जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी तसेच कर्मचा-यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या प्रतिनिधीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनिल लांडगे यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले; परंतु त्यानंतर अद्याप कंपनीच्या प्रतिनिधीने प्रशासनाशी चर्चा केलेली नाही.
सद्य:स्थितीत कर्मचारी कामावर येत नसल्याने आरोग्य केंद्रातील डाटा एन्ट्रीचे काम रखडले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कर्मचा-यांशी होतोय संपर्क
दुसरीकडे कंपनीचे अधिकारी परस्पर कर्मचा-यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना कामावर आहात का, हजेरी पाठविली का, कामावर का गेले नाही असे प्रश्न विचारून भंडावून सोडले जात आहे; परंतु कर्मचा-यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना वेतनाविषयी विचारणा केल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही.

माहिती अपडेट होणे झाले बंद
प्राथमिक आरोग्य केंद्रातून दररोज एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती दिली जाते; परंतु कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून ही माहिती अपडेट होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी जिल्ह्यातील आजारांची काय स्थिती आहे हे समजू शकत नाही.

किती रुग्णांची तपासणी झाली हे समजणे कठीण
कंपनीने कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याने महिनाभरापासून करार कर्मचा-यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे बंद केले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाटा एन्ट्रीचे काम खोळंबले आहे. त्यातून जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभरात किती रुग्णांची तपासणी झाली, साथीच्या आजाराची स्थिती काय आहे याची माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचा-यांची कसरत होत आहे. सद्य:स्थितीत हे काम आरोग्य विभागातील लिपिकांना दैनंदिन काम सांभाळून करावे लागत आहे.
अधिकारी म्हणतात...
- इगल कंपनीचा प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी येऊन गेला. त्यानंतर संबंधित प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ; परंतु तो झालेला नाही. त्यामुळे नेमकी स्थिती समजू शकत नाही.
डॉ. आर. व्ही. पाटील, प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
- कंपनीचे प्रतिनिधी रोज संपर्क साधतात. वेतनाविषयी विचारणा केल्यावर टोलवाटोलवी केली जाते. परिणामी आता कंपनी विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही.
चंद्रकांत सोनवणे, डाटा एन्ट्री कम अकाउंटंट