आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांपासून जि.प.चे अधिकारी-कर्मचारी झालेय शिथिल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीमुळे यंत्रणा ढिसाळ झालेली आहे. लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने अधिकारी कार्यालयात थांबत नाहीत. कर्मचारीही कार्यालयाबाहेर अधिक आणि कार्यालयात कमी काळ थांबतात. त्यामुळे जनविकासाची कामे खोळबंली आहेत.

जिल्हा परिषदेच्या नवीन कार्यकारिणी निवडीसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागू झाली. तत्पूर्वीच निवडणुकीचा फीव्हर असल्याने लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष केले. परिणामी पदाधिकार्‍यांचा दबावगट काही प्रमाणात कमी झाल्याने अधिकारीदेखील निर्धास्त झालेले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या तीन महिन्यांपासून अधिकारी निर्धास्त झालेले आहेत.दुपारी चार वाजेनंतर कार्यालयात अधिकारी सापडत नाहीत. तर अधिकारी नसल्याने कर्मचारी जागेवर थांबत नाहीत. गेल्याच आठवड्यात शिक्षण, अर्थ व पाणीपुरवठा विभागातील दहा कर्मचार्‍यांना उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. मात्र, त्यानंतरदेखील स्थितीत सुधारणा झालेली नाही. सध्या जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी रजेवर असल्याने या कार्यालयात शिपाई सोडल्यास कर्मचारी जागेवर थांबत नाहीत. हीच अवस्था शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुधन विकास कार्यालयाची आहे. कामापेक्षा सध्या अधिकारी, कर्मचारी यांचे सुटीच्या नियोजनावर अधिक भर आहे. विकासकामांना त्यामुळे ब्रेक लागला आहे.

कर्मचारी फेसबुकच्या प्रेमात
दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान तसेच सायंकाळी 4:30 ते 5:30 या कालावधीत जिल्हा परिषदेतील बहुतांश कर्मचारी संगणकावर फेसबुकवर भ्रंमतीत गुंतलेले असतात. तर काही कर्मचारी हे संगणकावर पत्त्यांचा खेळ खेळताना दिसतात.संग्राम कक्षासह एनआरएचएम, लेखा शाखेत हे कर्मचारी कामाच्या वेळेत संगणकावर फेसबुक, ऑर्कूट, यूट्यूबमध्ये गुंतलेले असतात. संगणकाचा वापर त्यासाठीच होताना दिसतो.

विजेचा होतो अपव्यय
जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागात अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसताना दिवे व पंखे सुरू असतात. विशेषत: एनआरएचएम विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघुसिंचन विभाग, शिक्षण विभागात हा प्रकार सर्रास घडत असतो. काही ठिकाणी तर संगणकदेखील अधिकारी नसताना सुरू असतात. त्यामुळे विजेचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असतो. दिवे, पंखे बंद करण्याची कोणीही तसदी घेत नाही.

सीईओच जागेवर आढळत नसल्याने कामे होतात ठप्प
गेल्या तीन महिन्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे हे जिल्हा परिषदेपेक्षा अधिक वेळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात थांबतात. दुपारच्या सत्रात शक्यतोवर साहेब डीआरडीएला गेले असल्याचे उत्तर स्वीय सहायक यांच्याकडून मिळते. परिणामी कार्यालयीन प्रमुखच नसल्यावर इतर अधिकार्‍यांचीही सोय होते.दुपारी चार वाजेनंतर विभागप्रमुख जागेवर सापडणे सध्या दुर्मीळ झालेले आहे. एखाद्या विषयासंदर्भात माहिती विचारण्यास गेल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यासह अधिकारी रजेवर असल्याचे उत्तर मिळते.