आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणी परीक्षांचा खर्च पेलताना शिक्षक बैचेन, एक चाचणी घेण्यासाठी किमान ३०० रुपये खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या चाचण्यांचा खर्च कसा भागवायचा, याबाबत शिक्षकांमध्ये बैचेनीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांसाठी कोणताही निधी मिळत नसल्याने शिक्षकांना स्वखर्चातून त्या घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्वरित आर्थिक तरतूद करण्याची मागणी अखिल प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
जिल्हा परिषदेने वर्षभरात घ्यावयाच्या १० चाचण्यांची पुस्तिका यापूर्वीच पुरवली आहे. जूनमध्ये घ्यावयाच्या चाचण्यांत वार्षिक नियोजनात समावेश नसलेल्या घटकांवर आधारित प्रश्न विचारल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची धांदल उडाली. त्यातच या चाचण्यांसाठी वर्षभर आर्थिक तरतूद कशी करायची, याचीही त्यांना चिंता आहे. प्रशासनाने तर यासाठी कुठलाच निधी दिलेला नाही.

यापूर्वी खर्च भागवण्यासाठी टक्के सादिलवार रक्कम मिळायची, आता तर तीदेखील बंद झाली अाहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये या चाचण्यांबाबत फारसे उत्साही वातावरण दिसत नाही. मोफत आणि सक्तीचे शिक्षण या नावाखाली विद्यार्थ्यांकडून यासाठी फी घेता येत नाही. फी घेतल्याची पालकांनी तक्रार केल्यास चौकशीअंती शिक्षक, मुख्याध्यापकांनाच दोषी ठरवले जाते. मुख्याध्यापक लेखापरीक्षणाच्या भीतीने शालेय अनुदानातून खर्च करायला तयार नाहीत. चाचणी तर घ्यायची आहेच, पण त्यावरील खर्चाची तरतूद कशी करायची? यासाठी शेवटचा पर्याय विषय शिक्षक किंवा वर्गशिक्षकच असतात.

वर्षभरात होतात १० चाचण्या
वर्गात ४० विद्यार्थी गृहित धरल्यास विषयांचे पेपर, प्रत्येक पेपर १/२/३ पानांचा असेल. वर्षभरात १० चाचण्या घेतल्या जातात. एका चाचणीसाठी किमान ३०० रुपये खर्च येतो, म्हणजेच वर्षभरात ३००० रुपयांचा भुर्दंड प्रत्येक विषय शिक्षक किंवा वर्गशिक्षकांना सहन करावा लागतो. चाचण्यांवरील खर्चाचा भार शिक्षकांवर पडू नये, म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

निधी मिळावा
^पोषण आहाराची ऑनलाइन माहिती दररोज द्यावी लागते. त्यामुळे नेटचा खर्च आहे. यासह या चाचण्यांचाही खर्च करावा लागतो. वर्षभरात सुमारे ३०० ते ५०० रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. प्रशासनाने यासाठी निधी दिल्यास चाचण्यांमधून खरी गुणवत्ता दिसून येऊ शकेल. रवींद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष, अखिल प्राथमिक शिक्षक संघ
बातम्या आणखी आहेत...