आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील भीषण हत्याकांड: गावकऱ्यांनी पाच भिक्षुकांना ठेचून मारले, आतापर्यंत 23 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर ( जि. धुळे )- मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच जणांना बेदम मारहाण करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. रविवारी साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक राईनपाडा येथे बेभान जमावाने पाच भिक्षुकांना ठेचून मारले. यात चौघे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

 

मृत पाचही जण प्राणाची भीक मागत असताना क्रौर्य इतके पेटले होते की ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन या भिक्षुकांना लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: तुडवण्यात आले. त्यानंतर काहींनी चपला, दगडविटांनी ठेचले. यातच पाचही जणांनी प्राण सोडले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी आले. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. 


रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पिंपळनेर परिसरात प्रचंड तणाव असून नाशिक, नंदुरबार येथून पोलिस कुमक मागवण्यात आली.  मृतांमधील चौघे सोलापूर जिल्ह्यातील असून ते नाथपंथी डवरी समाजाचे आहेत. भीक मागून ते उदरनिर्वाह करीत. याप्रकरणी सायंकाळपर्यंत १५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  दरम्यान, मृत पाचही जण अापल्या १५ सदस्यीय कुटुंबीयांसह पिंपळनेर गावाजवळ राहत हाेते. पिंपळनेर पाेलिसांकडे या लोकांबाबत तशी त्यांची नाेंदही हाेती.


आठवडी बाजाराच्या दिवशी ते अनोळखी लोक बसमधून उतरले आणि...
साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावापासून २५ किमीवर राईनपाडा गावात रविवारी अाठवडी बाजार भरताे. बाजारात आजूबाजूच्या गावांतील आठ-दहा हजार ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. यात इतर जिल्ह्यांतून माेलमजुरीसाठी अालेल्या मजुरांचा प्रामुख्याने समावेश असताे. गावात सकाळी एक बस आली. बसमधून पाच अनोळखी व्यक्ती उतरल्या. परंतु त्यांच्यासाठी हा अखेरचाच दिवस ठरला.


एका संशयिताने मुलीला नाल्याकडे नेल्याची अफवा पसरत गेली...
बसमधून उतरलेल्या पाच जणांपैकी एकाने सहा वर्षांच्या मुलीला बहाणा करून गावातील नाल्याकडे नेल्याची अफवा बाजारात पसरली. त्यामुळे अनोळखी पाच जण मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या मनात घर केले.  काही ग्रामस्थ या संशयितांची विचारपूस करत होते. तेवढ्यात काहींनी मारहाण सुरू केली.


मेसेज, क्लिपने संशयाचे भूत वाढले
काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात साेलापूर जिल्ह्यातून तीनशे ते पाचशे जण अाले अाहेत. ते लहान मुले पळवतात, किडन्या काढून विकतात, असे मेसेज साेशल मीडियातून व्हायरल होत होते. यामुळे भीतीचे वातावरण अाहे. या मेसेजमुळे राईनपाडा येथे आलेल्या पाच जणांवर संशय बळावला. घटनेनंतर काही मिनिटांत हत्याकांडाची व्हिडिअाे क्लिप व्हायरल झाली.


ग्रामपंचायत कार्यालयात हिंसेने घेतले जीव
बाजारपेठेतील ग्रामपंचायत कार्यालय रविवारी बंद होते. ग्रामस्थांनी कुलूप तोडून पाच जणांना मारहाण करत कार्यालयात नेले. दगड, विटा, लाेखंडी सळया, प्लास्टिक खुर्च्या अशा हाती येईल त्याने दाेनशे ते तीनशेचा जमाव पाच जणांवर तुटून पडला. 


माेबाइलमुळे मृतांची ओळख पटली
मारहाणीत मृत्यू पावलेल्या पाचही जणांची अाेळख मृतांपैकी एकाच्या खिशातील माेबाइलमुळे पटली. भारत शंकर भोसले (वय ४५), भारत शंकर माळवे (४५), दादाराव शंकर भोसले (३६, खावे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), आगनूक ऊर्फ अप्पा श्रीमंत इंगोले (१९, मानेवाडी हुन्नुर, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) व राजू भोसले (४७, गोंदवून, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.


सर्वाधिक ८ बळी महाराष्ट्रात; अाैरंगाबाद जिल्ह्यातील दाेन घटनांत तिघांचा मृत्यू
> ८ जून : अाैरंगाबाद जिल्ह्यातील चंदगाव (ता. वैजापूर) येथे गावकऱ्यांनी चाेर असल्याच्या संशयावरून ७ जणांना मध्यरात्री बेदम मारहाण केली. यात दाेघांचा मृत्यू.
> १५ जून : अाैरंगाबाद शहराजवळील पडेगावात ‘पाेरधरी’ समजून दाेन बहुरूप्यांना मारहाण झाली, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


दिव्य मराठी अावाहन : अफवांना बळी पडू नका; सजग राहा, पण कायदा हाती घेऊ नका
साेशल मीडियाद्वारे अाज गैरसमज पसरवणारे, द्वेष वाढवणारे मेसेज माेठ्या प्रमाणावर पसरवले जात अाहेत. यातून समाजविघातक कृत्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न समाजकंटक करत असतात. छोटा-मोठा हिंसाचार किंवा अप्रिय घटना घडली की साेशल मीडियावर अफवांचे पेव फुटते. किरकोळ घटनांना जाणीवपूर्वक जातीय- धार्मिक रंग दिला जाताे. मग अशा घटनांचे लाेण राज्यभर नव्हे देशभर पसरत जाते. महाराष्ट्रात अलिकडेच दाेन समाजात तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडल्या. त्यावेळीही हेच घडले अाणि त्याची किंमत सामान्य, निष्पाप लोकांना जीव देऊन माेजावी लागली. सध्या ‘पाेरधरी अाले’ असा मेजेस माेठ्या प्रमाणावर पसरवला जात अाहे. 


काही ‘उत्साही’ लाेक अापल्याकडे अालेला मेसेज फक्त गावाचे नाव बदलून पुढे पाठवत अाहेत. यातून गैरसमज पसरून हिंसक पडसाद उमटत अाहेत. देशभरातील दहा राज्यांत हिंसक जमावाने पाेरधरी समजून ३० जणांचे बळी घेतले. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक ८ झाली अाहे. समाजात घडणाऱ्या अशा घटनांबाबत जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचेच कर्तव्य अाहे. मात्र गैरसमजातून कायदा हाती घेऊन एखाद्याच्या जीव घेण्याचा अधिकार काेणालाच नाही. त्यामुळे सर्वांनाच नम्र अावाहन अाहे की, साेशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका, त्याची खातरजमा करून घ्या. समाजात काही चुकीचे घडत असेल किंवा अशा दुष्प्रवृत्तीच्या व्यक्ती अाढळून आल्या तर त्यांना पकडून पाेलिसांच्या स्वाधीन करा, स्वत: कायदा हातात घेऊ नका.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...