आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • प्रतीक्षा पुतळा उद्घाटन व कार्यालय स्थलांतराची

प्रतीक्षा पुतळा उद्घाटन व कार्यालय स्थलांतराची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण पूर्ण झाल्याने पुतळा उद्घाटनाच्या, तर लाखो रुपये खर्चून उभारलेल्या महापालिकेच्या नवीन विभागीय कार्यालयाला जुन्या इमारतीतील कामकाज स्थलांतराची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जागेअभावी लालफितीतील नाट्यगृहाचा प्रश्न मात्र लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

34 वर्षांनी नूतनीकरण
2 मार्च 1971 रोजी नाशिकरोड देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष विठ्ठलराव अरिंगळे यांच्या कारकिर्दीत माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण झाले होते. 34 वर्षांपासून दुर्लक्षित पुतळ्याचे 60 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. पुतळ्यामागील बाजूस भव्य तट उभारण्यात आला आहे. प्रभागात राष्ट्रवादीच्या वैशाली दाणी, तर रिपब्लिकन पक्षाचे सुनील वाघ हे दोघे नगरसेवक असल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तारीख मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तारखेची निश्चिती होत नसल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

नवी इमारत धूळखात
लाखो रुपये खर्चून उभारलेली महापालिकेची विभागीय कार्यालयाची नवीन इमारत सव्वा वर्षापासून धूळखात पडून आहे. निवडणुकीपूर्वी घाईगर्दीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. मात्र, जुन्या इमारतीतील कामकाज अद्याप स्थलांतरित झालेले नाही.

नूतन इमारतीत कामकाज स्थलांतरीत व्हावे म्हणून गेल्या महिन्यात संभाजी ब्रिगेडतर्फे गाढव मोर्चा काढण्यात आल्यानंतर लवकरच स्थलांतर होईल, हे ठेवणीतील उत्तर प्रशासनाने दिले होते. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अर्धे कार्यालये जुन्या, तर एक-दोन कार्यालयांचे कामकाज नव्या इमारतीत सुरू असल्याने नागरिकांची फरफट होत आहे.