आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख लिटर पाणी वाया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर धरण ते बारा बंगला आणि तेथून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणार्‍या 1200 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या एअर वॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने गोविंदनगरजवळील सद्गुरूनगर येथे सुमारे 1 लाख लिटर पाणी वाया गेले. यामुळे या परिसरात जणू काही धो-धो पाऊस पडल्यानंतरची स्थिती निर्माण झाली होती. 45 मिनिटांनंतर या वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.

तिडके कॉलनीतून गोविंदनगर व पुढे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे जाणार्‍या या रस्त्यावर वाहनधारकांची आणि बघ्यांची झुंबड उडाली होती. वाहनधारकांना तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. गंगापूर धरणातून शहरात आलेल्या थेट पाइपलाइनपैकी एक असलेली 1200 मि. मी. व्यासाची पाइपलाइन बारा बंगला येथून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाते. हीच वाहिनी सद्गुरूनगर येथे एअर वॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने फुटून जवळपास 45 मिनिटे पाणी वाया गेले.

याबाबतची माहिती मिळताच यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार, कार्यकारी अभियंता चव्हाणके यांच्यासह उपअभियंता अनिल नरसिंगे यांनी तत्काळ जलवाहिनीवरील वॉल्व्हची पाहणी करून हा एअर वॉल्व्ह बदलून पाणी बंद केले.

तत्काळ केली दुरुस्ती
जलवाहिनीवरील 150 मि.मी. एअर वॉल्व्हमध्ये मुख्य बिघाड झाला होता. त्यामुळे जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी पसरले. मात्र, त्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली आहे. या जलवाहिनीतून अशुद्ध पाणी गांधीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरणासाठी नेले जाते. अनिल नरसिंगे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

एका प्रभागाचे एका दिवसाचे पाणी
या जलवाहिनीद्वारे नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागाला पाणीपुरवठा केला जातो. आणखी काही काळ दुरुस्ती करण्यासाठी गेला असता तर कदाचित या भागाच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला असता. साधारणपणे एका प्रभागाला एका दिवसाला पुरेल इतके पाणी या 45 मिनिटांच्या कालावधीत वाया गेले. मात्र, तातडीने दुरुस्ती केल्याने मोठा अपव्यय टळला.

जलवाहिनी फुटून सद्गुरूनगरकडून मायको सर्कलकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.

शहरातील वाहतूक बेटांवर उभारण्यात आलेले कारंजे पाणी आणि नियोजनाअभावी कोरडेठाक पडले असताना याठिकाणी जलवाहिनी फुटल्याने असे दृश्य होते. पाण्याचा नवीन कारंजा सुरू झाला की काय, असा भास उपस्थितांना झाला.