आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांना मिळेनात 20, 50 रुपयांचे स्टॅम्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गैर प्रकार व शासन महसुलाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने शंभर रुपयांपेक्षा कमी दराच्या स्टॅम्पची मागणी करणार्‍या ग्राहकास कारण विचारल्यानंतरच तो द्यावा,असे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु स्टॅम्प विक्रेते त्याचा सोयीने अर्थ काढत शंभरपेक्षा कमी किमतीचा स्टॅम्प ओळखीच्याच व्यक्तीला देत असून, इतरांना ते संपल्याची उत्तरे देत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.

एखादा दस्ताऐवज शंभर रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा असल्यास आणि ग्राहकाने कमी किमतीच्या स्टॅम्पची मागणी केल्यास विक्रेत्यांनी ग्राहकांना त्याची कल्पना देत अधिक दराचा स्टॅम्प घेण्याची विनंती करावी. ग्राहक ऐकत नसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते याचीही कल्पना त्यास द्यावी. असे स्पष्ट आदेश शासनाने यापूर्वीच दिले आहे. मात्र विक्रेते ओळखींच्यांनाच कमी दराचे स्टॅम्प विकत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दिव्य मराठी च्या प्रतिनिधींनी जिल्हा न्यायालयातील अँड. मल्टी परपज सोसायटीच्या मुद्रांक वितरण कार्यालयात 50 रुपयांच्या स्टॅम्पची मागणी केली. विक्रेत्याने शिल्लक नसल्याचे उत्तर दिले. पन्नासचा स्टॅम्प संपला असून हवा असेल तर शंभर रुपयांचा स्टॅम्प घेण्याचा आग्रह धरला. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या एका वरीष्ठ स्टॅम्प विक्रेत्यानी तत्काळ 50 रुपयांच्या स्टॅम्प देण्यास सहमती दर्शविली.

व्यवहार शंभराच्या स्टॅम्पवरच करावे
10 आणि 20 रुपयांच्या स्टॅम्पची बंगलोर येथे होणारी छपाई बंद झाली आहे. केवळ शिल्लक असलेलेच स्टॅम्प विकले जात आहे. मात्र नागरिकांनी आपले व्यवहार शक्यतो शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरच करावे. शैक्षणिक कामासाठी स्टॅम्पचीही गरज नाही. इतर स्टॅम्पचा अपेक्षेप्रमाणे आम्ही पुरवठा करतो. 50 रुपयांचे स्टॅम्प मात्र तपासणी करून विक्रेत्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे.
-बी. जी. निर्मळ, कोषागार अधिकारी

10, 20 रुपयांच्या स्टॅम्पची छपाई बंद
10 आणि 20 रुपयांच्या स्टॅम्पवर मागील तारखा दाखवून खोटे व्यवहार केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच अधिक रकमेचे व्यवहारही याच स्टॅम्पवर केले जात असल्याने शासनाचे मोठय़ा प्रमाणावर होणारे महसुली नुकसान पाहता त्यांची छपाईच शासनाने बंद केली आहे.