आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्यांसह मोठ्यांनी लावली १० हजार राेपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कोणी पाणी आणण्यासाठी... कोणी रोपं आणण्यासाठी... कोणी खोदलेल्या खड्ड्यांत पाणी टाकण्यासाठी... तर काही चिमुकले वृक्षांची आवड असल्याने उन्हातान्हातही वृक्ष लागवडीसाठी धावाधाव करताना दिसत होते. काही ज्येष्ठ महिला आणि पुरुषदेखील पाच लिटर पाण्याची कॅन घेऊन रोपांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करीत होते.
निमित्त होते, पर्यावरण दिनानिमित्त फाशीच्या डोंगरावर (देवराई) आपलं पर्यावरण या संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून ‘क्रेडाई’, वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि विद्यार्थ्यांच्या साहाय्याने १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे. गंगापूर गावाजवळ असलेल्या फाशीच्या डोंगरावर पूर्वी वनविभागाने वृक्ष लागवड केलेली असून, तेथील वृक्षतोड आणि मृत झाडांमुळे या डोंगराला उजाड स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे या डोंगरावर हिरवळ आणि जंगल निर्माण करण्यासाठी आपलं पर्यावरण या संस्थेने पुढाकार घेत १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार, जून या जागतिक पर्यावरणदिनी या परिसरात १० हजार विविध जातींच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यासाठी गत दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते.
‘क्रेडाई’च्या वतीने डोंगराच्या चारही बाजूने भिंतीचे कुंपण उभारण्यात आले आहे. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेत वृक्षारोपणासाठी पर्यावरणप्रेमींसह लहान मुलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होती. या मोहिमेत त्यांचे पालकही त्यांना मदत करताना दिसून येत होते. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, सहसंचालक अरविंद विसपुते, ‘आपलं पर्यावरण’चे अध्यक्ष शेखर गायकवाड, सुरेश नखाते, अक्षय भोपळे, अक्षय शिरसाठ, प्रसाद गायधनी, मैत्री दामले, सूरज मोरे, अंकिता कुलकर्णी आदी उपस्थित होते. पर्यावरणदिनी या मोहिमेतील उत्स्फूर्त सहभाग सर्वांसाठीच प्रेरणादायी असा ठरला.
तीन वर्षे करणार रोपट्यांची देखभाल
फाशीच्या डोंगरावर लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची तीन वर्षे आपलं पर्यावरण ही संस्था देखभाल करणार आहे. त्यासाठी आठवड्यातून दोनदा पाणी देणे, जनावरांनी रोपे खाऊ नयेत म्हणून रात्रंदिवस या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात येणार आहेत.