आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100% कर भरणाऱ्यांना वर्षभर मोफत दळण; विंचूरदळवी ग्रामपंचायतीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- पाणीपट्टी,घरपट्टी आदी करांचा मुदतीच्या आत १०० टक्के करभरणा करणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभराचे दळण मोफत देण्याचा निर्णय विंचूरदळवी येथील ग्रामसभेत घेण्यात आला. यापूर्वी तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीने असा उपक्रम राबविल्याने करांची १०० टक्के वसुली होण्यास मदत झाली आहे. त्याच धर्तीवर विंचूरदळवी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. 
 
ग्रामपंचायतीच्या मालकीची पीठ गिरणी सुरू करण्यासाठी गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. सरपंच संगीता पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रप्रमुख पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजना गावात राबविण्यात आली असून, या योजनेचे काम पूर्ण होताच सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
 
समाजकल्याण विभाग, कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेली ‘अनुदानावरील अवजारे’, ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’, ‘स्वस्थ महाराष्ट्र अभियान’ आदी विविध योजनांची ग्रामविकास अधिकारी गिरी यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पुरवणी कृती आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी घेण्यात आली. 
१४ व्या वित्त आयोगातून गतवर्षी झालेली कामे आणि नव्याने हाती घेण्यात येणारी कामे, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी गावात निर्माण झालेल्या समस्यांचीही चर्चा करण्यात अाली. तसेच सर्व प्रकारच्या जमाखर्चाचा ताळेबंद ग्रामसभेत सादर करण्यात आला. गावातील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्याचे ठरले. 
 
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने संमत झाला. तसेच शेतकऱ्यांच्या शेत मालाला उत्पादन खर्चानुसार हमीभाव देण्याची मागणी करण्यात अाली. बैठकीस सदस्य भास्कर चंद्रे, सविता बर्वे, दत्तात्रय शेळके, माजी सरपंच कैलास दळवी, विश्राम शेळके, शिवाजी दळवी, पांडुरंग दळवी, लक्ष्मण भोर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, भाऊसाहेब दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. अाभार ग्रामविकास अधिकारी गिरी यांनी मानले. राष्ट्रगीताने ग्रामसभेची सांगता झाली. 
बातम्या आणखी आहेत...