आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन यादीनुसार प्रवेश; विद्यार्थ्यांसह पालकांचा ‘बिटको’समोर रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नवीन मेरिट लिस्टनुसार बिटको कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी अकरावी प्रवेशाची यादी लावण्यात आली. त्यानुसार प्रवेशप्रक्रिया सुरू राहिल्याने काही पालक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. मात्र, याच संस्थेत पहिलीपासून शिक्षण घेणार्‍या व कमी टक्क्यांमुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी ‘बिटको’समोर अल्प काळ रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला.

27 जूनला लावलेल्या दुसर्‍या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न देताच कॉलेजने अँडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे फलक लावल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शनिवारी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉलेजने अहवाल दिल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण प्रक्रियेतील सहभागी विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज तपासणी केल्यानंतर मंगळवारी सकाळी नवीन मेरिट यादी लावण्याचे आदेश दिले होते. त्या यादीनुसार मंगळवारी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. तरीदेखील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.

प्रवेशासाठी ‘भाऊगर्दी’
मंगळवारी अकरावीचे 562 प्रवेश निश्चित झाले असून, चार हजार 682 जागा अद्याप रिक्त आहेत. मात्र, शहरातील महत्त्वाच्या महाविद्यालयांतील प्रवेश जवळपास पूर्ण होत आले असून, एन. टी. (ब) व एस. सी. प्रवर्गाचे प्रवेशही संपुष्टात आल्याने आता पालकांनी प्राचार्यांसह ‘भाऊ-दादां’सारख्या राजकीय नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत.

प्राधान्याने हवा प्रवेश
‘न्यू एज्युकेशन’च्याच विविध शाळांमध्ये पहिलीपासून शिकलेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पालकांनी संस्थेच्या या धोरणाचा निषेध करीत अन्य संस्थांप्रमाणे विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी मागणी लावून धरली.

केवळ 20 टक्क्यांसाठीच
त्याच संस्थेतील शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत केवळ 20 टक्केच आरक्षणाचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच संस्थेच्या कॉलेजमध्ये प्रवेशाची सक्ती करता येत नाही.
-नवनाथ औताडे माध्य. शिक्षणाधिकारी

महाविद्यालयनिहाय जागा (कंसात रिक्त जागा)
>केटीएचएम : कला -562 (158), विज्ञान-1207(113), वाणिज्य-1018(182), एकूण - 2787 (453)
>एचपीटी व आरवायके : कला-167(193), विज्ञान-528 (312), 695 (505 )
>बीवायके : वाणिज्य : 735 (225)
>नाशिकरोड बिटको : कला-180 (60), विज्ञान-412 (188), वाणिज्य-315 (165), 907 (413)
>एसएमआरके: कला- 84 (36), विज्ञान-120 (120), वाणिज्य- 70 (50), एकूण- 274 (206)
>भोसला : कला - 148 (92), विज्ञान-195 (165) वाणिज्य - 187 (53), एकूण - 530 (310)
>के. व्ही. एन. : कला 70 (50) विज्ञान- 230 (10), वाणिज्य- 249 (120) एकूण 540 (180)