नाशिक - अकरावी अाॅनलाइन प्रवेशाच्या दुसरा टप्प्यास शुक्रवारपासून (दि. १६) सुरुवात हाेणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत शाखानिहाय अर्ज भरता येणार असून पहिली एकत्रित गुणवत्ता यादी ३० जूनला प्रसिद्ध होणार आहे. यंदा प्रथमच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली असून जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ते नोंदविता येतील.
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी यंदापासून शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने केली. त्यात प्रथम टप्प्यात संबंधित शाळांतून विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले आहेत. आता प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये प्रथम टप्प्यात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता शाखानिहाय अर्ज सादर करता येईल.
प्रत्यक्ष प्रवेशास जुलैपासून सुरुवात होणार आहे. परंतु, संपूर्ण राज्यभर एकाच वेळी प्रवेशाची प्रक्रिया होणे अपेक्षित असल्याने त्याचे वेळापत्रक अद्याप पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयातून जाहीर झालेले नाही. त्यामुळे त्यात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता अाहे. असे असले तरी जुलैअखेर प्रवेशाच्या सर्व फेऱ्या पूर्ण होणार असल्याचेमाध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील शाखानिहाय अर्ज भरण्याची व्यवस्थाही शाळेतूनच करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतूनच अर्ज भरण्याचे अावाहन शिक्षण विभागाने केले आहे.
एकाफेरीत एकाच शाखेसाठी अर्ज : विद्यार्थ्यांनाप्रवेशासाठी एका वेळी दहा महाविद्यालयांचा पर्याय असला तरी एका फेरीत या दहा महाविद्यालयांमध्ये एकाच शाखेसाठी अर्ज करता येईल. फेरीनिहाय विद्यार्थ्यांना शाखेबाबत पसंती बदलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत निवडलेल्या शाखेत त्यानंतर फेऱ्यांमध्ये बदल करण्याची सुविधा शिक्षण विभागाने दिली.
मुख्याध्यापक-उपप्राचार्यांचेप्रशिक्षण : शाखानिहायअर्ज भरण्यापासून पुढील प्रवेशाची अर्थात दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून १७१ शाळांचे मुख्याध्यापक ५७ कनिष्ठ महाविद्यालयांच्या उपप्राचार्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को विद्यालयात हे शिबीर घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना शाखानिहाय अर्ज कसा भरायाचा याची ऑनलाईन माहिती नाशिकरोड महाविद्यालयाचे प्रा. वैभव सरोदे यांनी दिली. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, सहाय्यक शिक्षण निरीक्षक अशोक बागूल, के. डी. मोरे, शिक्षणाधिकारी कार्यालयातील श्रीमती धनगर, श्री. पाटील अादी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्यांनाही संधी
पहिल्या फेरीत अर्ज भरून अाॅनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरता येतील. परंतु, त्यांना प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
२० जूनपासून प्रवेशाचा कोटाही उपलब्ध
शहरातील ५७ महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या सर्वच शाखांसाठीच्या जागा आणि त्याचा ठरलेला कोटा विद्यार्थ्यांना २० जूनपासून ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. त्यात २० टक्के इन हाऊस, टक्के व्यवस्थापन, अल्पसंख्यांक संस्थांमध्ये अल्पसंख्याक कोटा ५० टक्के आणि बायफोकल कोटा २५ टक्के याची माहितीही विद्यार्थ्यांच्या समोरच असेल. त्यामुळे एकूण जागांच्या किती टक्के जागा भरल्या आहेत, किती जागा कुठल्या घटकांसाठी राखीव आहेत, हेही स्पष्ट होणार असल्याने प्रवेशात पूर्णत: पारदर्शकता येणार आहे.