आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा चादरींचा दाेरखंड करून सुधारगृहातून १२ मुले पळाली, दोघांना पुण्यात पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुले कशी पळाली ते दाखवणारे रेखाचित्र, दुसऱ्या फोटोत मुलांनी बांधलेली चादर. - Divya Marathi
मुले कशी पळाली ते दाखवणारे रेखाचित्र, दुसऱ्या फोटोत मुलांनी बांधलेली चादर.
नाशिक/ पुणे - तुटपुंजी सुरक्षा व्यवस्था भेदत, खिडकीचे गज कापून व बारा चादरींचा दाेरखंड करून नाशिकच्या किशाेर सुधारगृहातील १२ विधिसंघर्षग्रस्त बालकांनी पलायन केले. रविवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस अाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बालसुधारालय विभागाच्या महानिरीक्षकांनी दाेन सुरक्षा रक्षकांना निलंबित केले असून इतर कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू केली अाहे. दरम्यान, या १२ पैकी दाेन मुलांना पुणे जिल्ह्यातील निगडी परिसरात पकडण्यात यश अाले अाहे. यापैकी एक जण १८ वर्षांचा अाहे, अशी माहिती निगडीचे पाेलिस निरीक्षक अार. बी. उंडे यांनी दिली.

राज्यातील विविध गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झालेले २६ मुले नाशिकच्या किशाेर सुधारालयात अाहेत. या अाठ मुले रविवारी मध्यरात्री बराक नंबर १ चा गज कापून बाहेर अाले, तर दुसऱ्या बराकीची कुलूप उघडून इतर चार जण बाहेर अाले. या बाराही जणांनी मानवी मनाेरा करत सुधारगृहाच्या सुमारे १५ फूट उंच दगडी भिंतीवरून उड्या घेतल्या. विशेेष म्हणजे रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. मात्र साेमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांच्या शाेधासाठी तत्काळ दाेन पथके राज्यभर पाठवण्यात अाली. दरम्यान, किशोर सुधारालयाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय या प्रकरणाची दखल घेत तत्काळ पुणे येथून नाशिकला रवाना झाले. येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या प्रकरणात कर्मचाऱ्यांची चूक असल्याचेच स्पष्ट झाल्यामुळे रात्रपाळी कर्मचारी राजेंद्र झाल्टे, भास्कर भगत यांना निलंबित करण्यात आले, तर इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली.

कर्मचारी अधिक, तरीदेखील
नाशिकच्या किशोर सुधारालयात सध्या ३४ कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. रात्री दोन कर्मचारी आत आणि दाेघे प्रवेशद्वारावर होते. मात्र, इतर कर्मचारी कुठे होते याबाबत सुधारालय प्रशासनाकडे माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पळालेल्या बंदिवानांमधील मॉनेटरने दुसऱ्या बराकीची किल्ली चोरली असल्याचे उघडकीस आले.
यंत्रणेवरच संशय
सुधारालयात दाखल असलेल्या विधिसंघर्षशील बालकांवर अत्याचार होत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मारहाण, शिवीगाळ आणि क्षमतेपेक्षा अधिक कामे करून घेतली जात असल्याची चर्चा अाहे. कर्मचारी आर्थिक फायद्यासाठी सोयीनुसार ड्यूटी करत असल्याची चर्चा आहे.

अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणार
या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. किशोर सुधारालयाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जातील.
भूषणकुमार उपाध्याय, पोलिस महानिरीक्षक, किशोर सुधारालय पुणे
पुढील स्लाइडवर वाचा, कसे केले मुलांनी पलायन...
बातम्या आणखी आहेत...