आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूरक परीक्षेचा निकाल नाही, वर्ष वाया जाणार, १२ वी नापासांची अडचण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहावीप्रमाणे १२वी नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षणमंत्र्यांनी पूरक परीक्षा जाहीर केली. मात्र परीक्षेचा निकाल अजूनही लागला नसल्याने ही घोषणा अर्धवटच राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पहिल्या वर्षाच्या सर्व जागा भरल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दहावीच्या नापास विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरची परीक्षा दिल्यानंतर त्यांचे एक वर्ष वाया जात होते. त्याऐवजी त्यांना त्वरित संधी मिळाली तर त्यांचे वर्ष वाया जाणार नाही या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार जुलै २०१५ मध्ये पूरक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३५,३४६ विद्यार्थ्यांना लगेच अकरावीत प्रवेश मिळाला व त्यांचे वर्ष वाया गेले नाही. या अनुभवावरून शिक्षणमंत्री तावडे यांनी हा निर्णय बारावीच्या परीक्षेसही लागू केल्याची घोषणा फेब्रुवारी २०१६ मध्ये केली. यंदा राज्यात १,७६,८७२ विद्यार्थी बारावीत अनुत्तीर्ण झाले. त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षणमंत्र्यांनी यंदापासून बारावीच्या पूरक परीक्षेची घोषणा केली. त्यानुसार ९ जुलै रोजी पूरक परीक्षा झाली, परंतु सव्वा महिना उलटून गेला तरी तिचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. दरम्यान, पहिल्या वर्षाच्या सर्व जागा भरल्याने आता निकाल लागला तरी त्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश सप्टेंबरपर्यंत होत असले तरी यंदा ऑगस्टमधेच सर्व जागा भरल्या आहेत.

नवीन तुकड्यांना मान्यता हवी
सध्या प्रथम वर्षाच्या सर्व शाखांच्या जागा शंभर टक्के भरलेल्या आहेत. १२वीच्या पूरक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळावा असे शासनाला वाटत असेल तर महाविद्यालयांत तत्काळ नवीन तुकड्यांना मान्यता द्यावी लागेल.
- डॉ दिलीप धोंगडे, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय, नाशिक

अाशेवर पाणी
माझा बारावीत एकच विषय राहिला होता. पूरक परीक्षेमुळे वर्ष वाया जाणार नाही असे वाटले होते. अजून निकाल लागला नाही. तीन-चार कॉलेजमध्ये चौकशी केली तर अॅडमिशन फुल्ल झाल्याचे सांगतात.- ऐश्वर्या साबळे, परीक्षार्थी
बातम्या आणखी आहेत...