आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरणातून १३000 रोपलागवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील रस्त्यांसाठी वृक्ष तोडण्यावरून उच्च न्यायालयापर्यंत वाद पोहोचला असताना, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने खासगीकरणातून पावसाळ्याच्या तोंडावर १३,८३५ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी निविदा काढता वनविकास महामंडळ वा सामाजिक वनीकरण विभागाला काम दिले जाणार असून, यासंदर्भातील दोन कोटी ४५ लाख रुपयांच्या ठेक्याला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या दुतर्फा तब्बल १५ ते १८ इंच इतकी मोठी झाडे लावली जाणार असून, जेणेकरून मोठी रोपे लावल्यास संरक्षक जाळ्यापासून तर देखभालीवर होणारा खर्चही वाचणार असल्याचा दावा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केला.

आयुक्त तथा सभापती गेडाम यांच्या उपस्थितीत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली. गेल्या वेळी वृक्षलागवडीच्या विषयावरून चांगलीच गरमागरमी झाली होती. खासगीकरणातून वृक्षलागवडीसाठी पालिकेने कंत्राट काढल्यानंतर
उद्योजकांनी स्वत:हून मोफत वृक्षलागवडीची इच्छा बोलून दाखवली. मात्र, या मुद्याचे राजकारण करीत उद्योजकांपुढे जाचक शर्ती ठेवल्यामुळे ही मोहीम बारगळली.

पालिकेला वृक्ष संरक्षण संवर्धन अधिनियमानुसार साधारणपणे दरवर्षी १० हजार लागवडीचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत १३,८३५ वृक्ष लावण्याचा निर्णय झाला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात ४०० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू असून, या रस्त्यातील वृक्ष तोडण्यास नाशिक कृती समिती या वृक्षप्रेमींच्या संघटनेने यापूर्वीच आक्षेप घेतला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे पालिकेला झाडे लावणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद झाला. दाेन्ही सरकारी यंत्रणांमार्फत वृक्षलागवड झाल्यास ई-निविदेच्या पर्यायांची चाचपणी करण्याचा निर्णय झाला. या वेळी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रा. कुणाल वाघ दीपाली कुलकर्णी उपस्थित होते.

अधिकार्‍यांकडून तक्रारींचा पाऊस, मनसेचा बचतगटांना विरोध : उद्यानांचीदेखभाल-दुरुस्ती बचत गटांकडून करण्याबाबतच्या निर्णयास मनसे नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी विरोध केला. बचतगटांना देखभालीचे तंत्र अवगत नसल्यामुळे उद्यानांची दुरवस्था होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यास प्रा. कुणाल वाघ यांनी हरकत घेत बचतगटांना कामे देण्याचा निर्णय महासभेत झाल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त ए. के. चव्हाण यांनी बचत गटांतील प्रतिनिधींना उद्यान देखभालीविषयी आठ दिवसांचे प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, बैठकीतून आयुक्त डॉ. गेडाम हे अचानक उठून गेल्यावर उद्यान विभागाचे अधिकारी आक्रमक झाले. खराेखरच शहरातील उद्याने जगवायची असतील वा कामात सुधारणा हवी असेल, तर सर्वप्रथम उद्यान वृक्ष प्राधिकरण हे दाेन्ही विभाग स्वतंत्र करण्याची गरज बोलून दाखवली.

सहाही विभागासाठी स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण निरीक्षकांच्या नियुक्तीची मागणी पी. पी. फाल्गुने यांनी केली. तसेच, साधारण १६ निरीक्षकांची गरज असताना निरीक्षकच कार्यरत असल्याचे सदस्यांना सांगितले. कार्यालयीन निरीक्षकांची वानवा उपअभियंत्यांच्या कामाविषयीच्या तक्रारीवरून जोरदार चर्चा झाली.

हे लागतील वृक्ष
कांचन, पिंपळ, कडूनिंब, पुत्रंजीवा, बकुळ, मोह, तामण, शिवण, अमलतास, कदंब, करंज, पंगारा, बेहेडा, रिठा, ओक, कायजेलिया, सप्तपर्णी, कैलासपती, सरू, ऑस्ट्रेलियन साग आदी रोपे लावली जातील.

येथे लागतील वृक्ष
शहर आणि परिसरातील विविध रस्त्याच्या दुतर्फा, खुल्या जागेत, मनपा शाळा, समाज मंदिरे, मलजलशुद्धीकरण केंद्र, नव्याने संपादित होणार्‍या जागा, जॉगिंग ट्रॅक, पाणी शुद्धीकरण केंद्र, आरोग्य केंद्रे येथे होणार लागवड.