आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये 13 किलो सोने, 26 लाख रूपये जप्त, दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकरोड परिसरातील मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयात दिवसाढवळय़ा दरोडा टाकणार्‍या दोघांना ठाणे व नाशिक पोलिसांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुद्देमालासह अटक केली आहे. हे आरोपी सख्खे भाऊ असून त्यांच्याकडून 13 किलो सोने व 26 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
नाशिकरोड परीसरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात 1 ऑक्टोबर रोजी पाच ते सहा जणांनी पोलिस तपासाच्या नावाखाली दरोडा टाकुन 16 किलो सोने व साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. मात्र नाशिक पोलिसांना गुन्हेगारांचा सुगावा लागत नव्हता. शनिवारी मध्यरात्री नाशिक पोलिसांच्या मदतीने ठाण्याचे सहायक निरीक्षक घाटगे व त्याच्या पथकाने गंगापूर रोडवरील सीरीन मीडोज कॉलनी या उच्चभ्रू वसाहतीतील पॅराडाइज अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या रूम नंबर 4 वर छापा टाकून दोघांना अटक केली. राजदत्त भाऊराव राणे (वय 32, रा.अपूर्व बिल्डिंग महात्मा फुले रोड, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम) व चंद्रशेखर भाऊराव राणे (वय 29) अशी आरोपींची नावे असून हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.
फिल्मी स्टाइल लूट
पोलिस आरोपीला तपासासाठी ज्या पद्धतीने घेऊन जातात, त्याच पद्धतीने हाती दोरखंड बांधून व तोंडाला काळा कपडा बांधून एका सहकार्‍याला नेत आरोपींनी हा दरोडा टाकला होता. दिवसाढवळय़ा झालेल्या या लुटीमुळे नाशिक पोलिसांची मात्र झोप उडाली होती. आरोपींच्या शोधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात होती.
साथीदार फितूर झाल्याने गुन्हेगार जेरबंद
प्रतिनिधी । नाशिक
नाशिकरोड येथील मणप्पुरम गोल्डच्या दरोड्यानंतर मुंबई परिसरातही याच पद्धतीने दरोड्याच्या दोन ते तीन घटना घडल्या होत्या. या घटनांमधील साम्य बघता पोलिसांच्या हाती मोठी टोळी लागण्याची शक्यता होती, त्यादृष्टीने तपासही सुरू होता. दरम्यान, दरोड्यात मिळालेल्या रकमेच्या वाटपावरून दरोडेखोरांमध्ये उफाळलेल्या अंतर्गत वादातून त्यांचा एक साथीदार ठाणे पोलिसांना संशय आला व या गुन्ह्याची उकल होण्यात यश आले.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने नाशिकरोड येथील मणप्पुरम गोल्डमध्ये पाच ते सहा जणांनी धाडसी दरोडा टाकला होता. तपासकामी संशयिताच्या चेहर्‍यांवर काळे कपडे टाकून व त्यांच्या हाताला दोरखंड बांधून पोलिस असल्याच्या आविर्भावात दरोडेखोरांनी कार्यालयाच्या आत प्रवेश करून यशस्वी दरोडा टाकला होता. या दरोड्यातील मुद्देमाल ठेवण्यासाठी सीरीन मीडोज या महागड्या वसाहतीतील पॅराडाइज अपार्टमेंटमधील जगदीश निरगुडे या मुंबईस्थित व्यक्तीचा दुसर्‍या मजल्यावरील 4 नंबरचा फ्लॅट राजदत्त राणे याने मागील महिन्यातच भाडेतत्त्वावर घेतला होता. यासाठी एका एजंटची मदतही घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांचे तेथे फारसे वास्तव्य नव्हते. दरोड्यात मिळालेल्या रकमेच्या वाटपातून वाद झाल्याने यातील एकाचा काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची कुणकुण लागल्याने जीव वाचविण्यासाठी एक साथीदार ठाणे पोलिसांना शरण आल्याने हा गुन्हा उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.