आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Maleri Patients Found In City March Month , One Dengue Patient

मार्च महिन्यात शहरात आढळले मलेरियाचे 15, तर डेंग्यूचा एक रुग्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिका क्षेत्रात डासांच्या निर्मूलनासाठी केवळ 20 पाठीवरील फॉगिंग मशीन आणि एक वाहनावरील फॉगिंग मशीन उपलब्ध आहे. पालिकेतर्फे सहा विभागात प्रत्येक तारखेनुसार याच्या फवारणीचे नियोजन केले जाते, मात्र शहरात फॉगिंग मशीनचा धूर केवळ नगरसेवकांच्या भोवतालीच होत असल्याने सामान्य नागरिकांना फवारणी होतांना दिसतच नाही; त्यामुळे धूर आणि औषध फवारणी ही केवळ कागदावरच होत असल्याचे दिसून येते.

नगरसेवकांचा होकार, नागरिकांचा नकार

फेब्रुवारी आणि मार्च महिना डासांच्या उत्पत्तीचा मुख्य कालावधी मानला जातो. त्यामुळे या काळात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव झालेला असतो. महापालिकेतर्फे डासांच्या नियंत्रणासाठी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, उघड्या गटारांमध्ये औषधांची व अस्वच्छ ठिकाणी डेल्टा मॅथरिन औषधांची फवारणी केली जाते. डासांच्या नियंत्रणासाठी ‘एस अँँड आर पेस्ट कंट्रोल’ या कं पनीला ठेका देण्यात आला आहे. ठेकेदारांचे कर्मचारी ज्या ठिकाणी फवारणी करतात तेथील नागरिकांच्या आणि प्रभागातील नगरसेवकांच्या सह्या घेणे त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे कर्मचारी फक्त नगरसेवकांच्या घरांच्या किंवा कार्यालयाच्या भोवताली धुराची आणि औषधांची फवारणी करून नगरसेवकांच्या सह्या घेतात मात्र, ज्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फवारणीच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


वाचू शकतात पालिकेचे एक कोटी

सर्वच नगरसेवकांचा विरोध डावलून शहरातील पेस्ट कंट्रोलसाठी दरवर्षी वादग्रस्त ठेकेदारालाच अडीच कोटी रुपयांचा ठेका दिला जातो. ठेकेदारासंदर्भात खुद्द कर्मचार्‍यांच्याही अनेक तक्रारी आहेत. पालिके नेच ही योजना स्वत: राबवल्यास पालिकेची एक कोटी रुपयांची बचत होईल असे नगरसेवकांचेही म्हणणे आहे.

265 कर्मचार्‍यांचा फौजफाटा

शहरातील विविध भागात पेस्ट कंट्रोलसाठी सुमारे 265 कर्मचारी कार्यरत आहेत. यात ठेकेदाराकडील कंत्राटी 200 कर्मचारी, तर पालिकेच्या 65 कर्मचार्‍यांचाही यात समावेश आहे. कर्मचारी संख्येच्या मानाने मात्र शहरात योग्य पद्धतीने पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तर नगरसेवकांच्या घर व कार्यालयांभोवती धूर फवारणी केली जात असल्याचे नागरिक सांगतात.


नागरिक, नगरसेवक आमने- सामने
फॉगिंगचे वास्तव जाणून घेण्यासाठी काही प्रभागामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. यात नगरसेवक आणि नागरिकांमध्ये मतभिन्नता आढळून आली. फवारणी झाल्याचे नगरसेवकांचे म्हणणे होते, तर नागरिकांनी मात्र याचा इन्कार केला. यापैकी काही प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे..
नगरसेवक म्हणतात..
प्रभाग क्रमांक 59
पंधरा दिवसापूर्वीच झाली फवारणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे फॉगिंग मशीनचा वापर करण्यात येतो. माझ्या प्रभागात पंधरा दिवसापूर्वीच फवारणी केली आहे. नागरिकांनाही याची माहिती आहे. तसेच प्रभागातही मशीनची अदलाबदल केली जाते. ग्रामीण भागात मशीनसह लिक्विडही दिले जाते. फवारणी योग्य पद्धतीने होते याबाबत कुणाचीही तक्रार नाही.
रमेश धोंगडे, नगरसेवक
नागरिकांच्या मते..
कर्मचारी येत नाहीत
आमच्या भागात डासांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी होत नाही. पालिकेचे कर्मचारी येतच नाहीत. बापू खोले, नागरिक
वारंवार मागणी केली
वारंवार मागणी केली. मात्र, औषध तर सोडाच पण डास निर्मूलनासाठी धुराचीही फवारणी आतापर्यंत करण्यात आलेली नाही. महेश गायकवाड, नागरिक


थेट प्रश्न
तारखेनुसार होते फवारणी
वैशाली पाटील मनपा मलेरिया विभाग प्रमुख
डास निर्मूलनासाठी कोणती उपाययोजना केली जाते?
नाशिक महापालिका क्षेत्रातील सहा विभागातील प्रत्येक प्रभागात तारखेनुसार फवारणीचे नियोजन केले आहे.
शहरात किती वेळा फवारणी केली?
सकाळच्या सत्रात फवारणी करण्यासाठी दोन ठेकेदार असून, सायंकाळच्या सत्रासाठी एकच ठेकेदार आहे.
शहरात डासांमुळे आजार झालेले किती रुग्ण आहेत?
मार्च महिन्यात 15 मलेरिया आणि डेंग्यूचा एक रुग्ण आहे.

औषधांचा कमी वापर
डॉ. सचिन हिरे मनपा आरोग्याधिकारी
किती दिवसांतून धूर फवारणी केली जाते?
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात कमीत कमी 30 ते 40 दिवसांनी धुराची फवारणी केली जाते.
धुराची फवारणी होते, तर मग डासांचा प्रादुर्भाव का?
पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी औषधांचा कमी प्रमाणात वापर केला जातो.
फवारणीच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे?
हे चुकीचे आहे. डासांचे नियंत्रण करणे हे महापालिकेचे कर्तव्यच आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. पाण्याच्या टाक्या, झाडांच्या कुंड्या स्वच्छ ठेवल्या पाहिजे. फवारणी योग्य पद्धतीने व वेळेवर केली जाते.