आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ दिवसांत १५०हून अधिक डेंग्यूचे संशयित, नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्न गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यूचा फैलाव हाेण्याची शक्यता अधिक असताना प्रशासनाकडून तातडीने अावश्यक त्या उपाययाेजना हाेणे गरजेचे असते. मात्र, प्रत्यक्षात तसे हाेत नसल्याने शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूचे १५०हून अधिक संशयित रुग्ण अाढळून अाले अाहेत. महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून शहर स्वच्छतेकडे हाेत असलेले दुर्लक्ष, जंतुनाशक फवारणीमध्ये होणारी दिरंगाई आणि नवीन बांधकामांच्या ठिकाणी तयार झालेले ‘ब्लॅक स्पॉट’ तसेच नागरिकांच्या बेजबाबदारीमुळे ठिकठिकाणी साचलेला कचरा, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतच असून, अाराेग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला अाहे. सुस्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उग्र रूप धारण करणाऱ्या या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...

गेल्याकाही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. अनेक नवीन बांधकाम तसेच वापरात नसलेल्या इमारतींतही पाण्याची डबकी साचली. यामुळे शहरात डेंग्यूने पाय पसरण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत तातडीने या ठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक फवारणी स्वच्छता हाेणे अपेक्षित हाेते. परंतु, प्रत्यक्षात तसे हाेताना दिसून येत नसल्याचे पालिकेची उदासीनता स्पष्ट हाेत अाहे.

प्रशासनाने डेंग्यूबाबत नागरिकांत पुरेसे प्रबाेधनही केले नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच तीन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण सातत्याने अाढळून येत अाहेत. विशेष म्हणजे, अशा स्थितीतही अाराेग्य विभाग निद्रितावस्थेतच अाहे. परिणामी, गेल्या महिन्यात नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागात तब्बल ४२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर अाले होते. वडाळागावातील एका आठ वर्षीय मुलीचा, तर काठे गल्ली परिसरातील एका युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचाही अहवाल पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राप्त झाला होता. शहरात सर्वच विभाग मिळून १५ दिवसांत तब्बल दीडशेहून अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण अाढळले अाहेत. याचे कारणही तितकेच भयानक अाहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी, नियमित उचलला जाणारा कुजलेला कचरा, जंतुनाशकांच्या फवारणीकडे होणारे दुर्लक्ष, जनजागृतीचा अभाव आणि प्रभावशून्य धूरफवारणी अशी काही प्रमुख कारणे समाेर अाहेत. विशेषत: नवीन बांधकामांच्या तळघरात साचलेल्या पाण्यामुळे अाणि तेथील अस्वच्छतेमुळे डासांच्या उत्पत्तीची शक्यता अधिक दाट हाेते.

अाठ महिन्यांत तब्बल ३४१ डेंग्यूचे रुग्ण
पावसाळ्यातसाचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. सद्यस्थितीत अशा डासांची संख्या प्रचंड वाढल्याने शहरात साथीचे आजार पसरत अाहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियामुळे दिवसेंदिवस विविध रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५१ डेंग्यूचे संशयित असून, त्यात १२२ रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात अाले अाहेत. त्यापैकी ७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले अाहे. गेल्या अाठ महिन्यांत म्हणजेच जानेवारी २०१६ पासून ३४१ डेंग्यूबाधित रुग्ण अाढळल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे.

अधिकाऱ्यांचे ‘हाताची घडी, तोंडावर बाेट’
वाढतीरुग्णसंख्या पाहता पालिकेच्या आरोग्य विभागाने घरातील पिण्याचे पाणी, टाक्या, शोभेची झाडे, टेरेसवरील प्लास्टिक, टायर्स, रिकामे डबे, एसीच्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे सांगत पाणी साचू देण्याच्या सूचना नागरिकांना केल्या. मात्र, शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या नवीन बांधकामांच्या तळघरांत, परिसरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांकडे, बंद तळघरांमध्ये हाेणाऱ्या डासांच्या उत्पत्तीकडे डाेळेझाकच केली जात आहे. अशा ‘स्पाॅट्स’बाबत विचारणा केल्यास ‘हाताची घडी, ताेंडावर बाेट’ अशीच काहीशी भूमिका अधिकारी स्वीकारत असल्याने ही स्थिती अधिक बिकट हाेत अाहे. हे स्पाॅट‌्स तातडीने नष्ट हाेणे अत्यंत गरजेचे बनले असताना प्रत्यक्षात तसे हाेत नसल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात अाहे.

आरोग्याधिकाऱ्यांच्या घराजवळच ही स्थिती
डेंग्यूझपाट्याने पाय पसरत असताना त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची स्थानिक नगरसेवक नागरिकांकडून वारंवार मागणी होत अाहे. मात्र, तातडीने माेहीम राबविण्याची केवळ अाश्वासनेच देणाऱ्या पालिका प्रशासनामुळे ही परिस्थिती अधिक बिकट हाेत अाहे. मंगळवारी शहरातील कालिकानगर परिसरात ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता चक्क आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांच्या घरानजीकच सुरू असलेल्या नवीन बांधकामांच्या तळघरात प्रचंड पाणी साचलेले अाढळून अाले. डेंग्यूच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या या अशा शहरातील अनेक स्पाॅट‌्सकडे पालिका प्रशासनाकडून हाेणाऱ्या दुर्लक्षामुळे अाजपावेताे शेकडाे नागरिकांना डेंग्यूचे बळी व्हावे लागले असल्याचे वास्तव अाहे. अशा ठिकाणी तातडीने विशेष स्वच्छता माेहीम राबविण्याची तसेच संबंधितांना सूचना करण्याची गरज निर्माण झाली अाहे.

द्वारका भुयारी मार्गातील डबक्यांकडेही दुर्लक्षच
द्वारका परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या भुयारी मार्गात गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड पाणी साचले अाहे. या पाण्यात डासांची माेठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असून, नजीकच्या परिसरात डेंग्यूचे रुग्ण अाढळले असल्याने पालिकेने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे बनले अाहे.

आदेशही ‘पाण्यात’...
शहरातमलेरियासह डेंग्यूच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणावर वाढ हाेत असल्याने महापाैर अशाेक मुर्तडक यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याची डबकी, डासांची उत्पत्ती ठिकाणे जाहीर करून येथे तातडीने अाैषध फवारणी करणे, पाणी काढून टाकण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, त्यांच्या या आदेशाकडेही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अाजघडीला शहरात अनेक ब्लॅक स्पाॅट‌्स, डासांची उत्पत्ती स्थाने कायम असल्याची बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे.

अधिकाऱ्यांची अशीही टोलवाटोलवी...
शहरात डेंग्यूच्या संशयितांचा अाकडा प्रचंड वेगाने वाढत असताना या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अाराेग्य विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत अारोग्यधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून टोलवाटोलवीच करण्यात आली. तर मलेरिया, डेंग्यूची जबाबदारी असलेल्या डॉ. राहुल गायकवाड यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल बंद हाेता. आरोग्य विभागाचा कोणीही वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराबाबत बाेलण्यास तयार नसल्याचे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून अाले. नागरिकांच्या अाराेग्याप्रति पालिका अधिकाऱ्यांची उदासीनता या प्रकारामुळे पुन्हा एकदा अधाेरेखित झाली अाहे.

थेट प्रश्न
डॉ. सचिन हिरे, सहाय्यक आरोग्यधिकारी, महापालिका
* शहरात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत असून, तशा ठिकाणांचीही संख्या वाढत अाहे. अापल्या विभागाकडून ठाेस उपाययाेजना का केल्या जात नाहीत?
-डेंग्यू, मलेरिया चिकुनगुणीया हे आमच्याकडे नाही. डॉ. गायकवाड या संदर्भातील काम बघतात.

*शहरात गेल्या पंधरा दिवसांत दीडशेहून अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण अाढळले आहेत, ही संख्या वाढण्याची शक्यताही अाहे. या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविणे मनपाला गरजेचे वाटत नाही का?
-मी या विषयावर काहीच बोलू शकत नाही. या संदर्भात फक्त डॉ. विजय डेकाटे किंवा डॉ. राहुल गायकवाड यांनाच बोलण्याचा अधिकार आहे. तेच वरिष्ठ आहेत.
बातम्या आणखी आहेत...