आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 हजार मते मिळवून दाखवण्‍याची गोडसेंना प्रतिआव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हेमंत गोडसे यांनी वैयक्तिक आरोप केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यांनी लोकसभा निवडणुकीत किमान 17 हजार मते मिळवून दाखवावीत, असे आव्हान मनसे गटनेते अशोक सातभाई व स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी बुधवारी दिले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गोडसे यांनी आधी ते राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत, हे स्पष्ट करावे आणि मगच आमच्या नेतेमंडळींवर आरोप करावे. विशिष्ट समाज कोणता हे स्पष्ट करावे. आतापर्यंत मनसेने मराठा समाजातील सदस्यांनाच सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. यामुळे जातीयवादाच्या आक्षेपात काहीही अर्थ नाही. सातभाई म्हणाले की, गेल्या चार वर्षात गोडसेंनी कधीही आंदोलनात भाग घेतला नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली सव्वादोन लाख मते हा त्यांचा नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच करिष्मा आहे. शिवसेनेतील त्यांची किंमत लवकरच त्यांना समजेल. पक्षनेतृत्वावर आमचा विश्वास असून, त्यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच असल्याचा आरोपही त्यांनी केला.


‘कुणीतरी लिहून द्यायचे आणि ते यांनी वाचून दाखवायचे’
गोडसे शिवसेनेत गेलेले असले तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेच गोडवे गात आहेत. आमदार वसंत गिते यांना भुजबळांविरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान देण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेकडून गितेंना आव्हान देऊन स्वत:च्या हिंमतीवर 17 हजार मते मिळवून दाखवावीत ‘कुणीतरी लिहून द्यायचे आणि ते यांनी वाचून दाखवयाचे’ हा प्रकार थांबवावा. पक्षामुळेच त्यांची ओळख झाली; अन्यथा त्यांना नाशिकरोडमध्येसुद्धा कुणी ओळखत नव्हते. पक्ष सोडण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नका, असे आपण त्यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी तो घेतला. रमेश धोंगडे, स्थायी समिती सभापती