आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात मिरचीची पूड फेकून 18 महिलांनी केले पलायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - येथील वात्सल्य महिला वसतिगृहाचे प्रवेशद्वार बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दूधवाला येणार म्हणून खुले होते आणि अचानक सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून एक-दोन नव्हे तर तब्बल 18 आर्शित महिला अक्षरश: जीव मुठीत धरून रेटारेटी करत तेथून सिनेस्टाइल पलायन करतात. काही कळण्याच्या आत गुदरलेल्या प्रसंगातून सुरक्षारक्षक सावरतो व पोलिसांत संपर्क साधतो. वसतिगृहातील कर्मचारी आवारातच चौघींना ताब्यात घेतात, तर काही वेळात सीबीएस परिसरात पाच पीडितांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले जाते. मात्र, 9 पीडिता पलायन करण्यात यशस्वी होतात.

महिला व बालविकास आयुक्तालयाच्या या वसतिगृहातील सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वसतिगृहात पीडितांचे पुनर्वसन करण्याचे काम केले जाते. त्यासाठी शासनाकडून आहार, निवार्‍यापासून प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार 28 नोव्हेंबरला मुंबई परिसरातील बार व अनैतिक व्यवसायात अडकलेल्या 41 महिला व युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. या महिलांना पुनर्वसनासाठी वसतिगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या परिसरातील संबंधित संस्था या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी समोर न आल्यामुळे त्यांची रवानगी नाशिकमधील वात्सल्य वसतिगृहात करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांपासून या महिला एकत्र राहत होत्या. यातील काही महिला कर्नाटक, बंगळुरू येथील असून, त्यांची मुले तसेच नातेवाइकांकडे जाण्याचा त्या आग्रह धरत होत्या. मात्र, सुटकेचे आदेश नसल्यामुळे वसतिगृहाने त्यांची मुक्तता केली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच दोन महिला सहकारी यशस्वीपणे पळून गेल्याचे बघून शेवटी बुधवारी पहाटे या महिलांनी सुरक्षारक्षक कैलास लकारियाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्याचा प्रयत्न करून पलायन केले. सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे 9 पीडितांना ताब्यात घेण्यात आले.

शोध सुरू आहे
वसतिगृहातून पहाटे 18 पीडित महिला पळून गेल्याची तक्रार आल्यावर पोलिसांनी आठ महिलांना ताब्यात घेतले. उर्वरित महिलांचा शोध सुरू आहे. त्या हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे. राजेश आखाडे, पोलिस निरीक्षक

असा आहे बंदोबस्त : 2 सुरक्षारक्षक, 2 महिला पोलिस व 1 पहारेकरी.

कोर्टाला वारंवार कळवले
पीडितांची वसतिगृहाविषयी तक्रार नव्हती. मात्र, त्यांना कुटुंबीयांची आठवण येत असल्यामुळे सुटकेची त्या मागणी करत होत्या. त्यानुसार वारंवार न्यायालयालाही कळवले होते. न्यायालयाच्या आदेशाशिवाय मुक्तता करता येत नाही. - नलिनी पाटील, परिवीक्षाधीन अधिकारी, वात्सल्य वसतिगृह

बालगुन्हेगार पळाला
किशोर सुधारालयातील खुनाच्या आरोपातील एक बालगुन्हेगार बुधवारी पी. जी. खैरे या कर्मचार्‍यास मारहाण करून पळून गेला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.