नाशिक - मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीएच्या २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे रविवारी (दि. २९) कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात आली. नाशिकमध्ये पाच केंद्रांवर झालेल्या परीक्षेस २२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
देशभरातील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॅट, तर एआयसीटीईतर्फे घेतली जाणारी सी-मॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या २४०० विद्यार्थ्यांपैकी २२०० विद्यार्थ्यांनी शहरातील संदीप फाउंडेशन, गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, सपकाळ कॉलेज, भुजबळ नॉलेज सिटी संचलित मेट अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय या पाच केंद्रांवर दोन सत्रांमध्ये झालेली परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल जानेवारीत जाहीर होणार असल्याची माहिती संदीप फाउंडेशनचे डॉ. राकेश पाटील यांनी दिली.
नाशिकमध्ये १२२४ जागा
नाशिकमध्येएमबीए अभ्यासक्रमाची २४ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशासाठीच्या १२२४ जागा आहेत. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
अशी होईल सी मॅट परीक्षा
>ऑनलाइन नोंदणी नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१५
>प्रवेशपत्र उपलब्ध जानेवारी २०१६
>ऑनलाइन परीक्षा १७ जानेवारी २०१६
>परीक्षेचा निकाल २१ जानेवारी २०१६
एआयसीटीईतर्फे जानेवारीत सी-मॅट
एआयसीटीई २०१६-१७ च्या एमबीए प्रवेशासाठी सी-मॅट रविवार (दि. १७) २०१६ रोजी ऑनलाइन होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, कोणत्याही शाखेचा पदवीधर पदवी अंतिम वर्षाचे प्रवेश घेऊ शकतात. क्वांटेटिव्ह टेक्निक्स डाटा इंटरप्रेटेशन, लॉजिकल रिजनिंग, लँग्वेज कॉम्प्रेशन, जनरल अवेअरनेस विषयांवर ४०० गुणांची परीक्षा होईल.