आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 % Reservation In School For Bakward Class Society Child Issue

शिक्षण अधिकाराला संस्थांची बगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना एकूण कोट्याच्या 25 टक्के प्रवेश देण्याच्या शासन आदेशाला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही तालुक्यात 127 जागा रिक्त असल्याची माहिती उजेडात आली आहे. तर, शिक्षण विभागाला 25 टक्के प्रवेशाच्या याद्या सादर करणा-याखासगी शाळांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी आकारली असून, शासनाकडून प्रतिपूर्ती झाल्यानंतर ती पालकांना परत देण्याची भूमिका घेतल्याने शिक्षण अधिकार कायद्याला बगल देण्याचा हा प्रकार समोर आला आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याच्या कारणास्तव अनेक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता येत नाही, ही बाब विचारात घेऊन शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची पद्धत शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये सुरू केली आहे. मात्र, या आदेशाला शिक्षण संस्था भीक घालत नसल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीवरून समजते. गतवर्षी शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या शाळांनी त्या बदल्यात शासनाकडे अनुदानाची मागणीच केली नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे शाळांनी प्रवेश देताना खरोखरच आर्थिक कुवत नसणा-याविद्यार्थ्यांना प्रवेश दिला की, कागदोपत्री प्रवेश दाखवले, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर, दुसरीकडे शासनाने पहिल्या दोन वर्षांचे अनुदान दिले नसल्याची ओरड शाळांनी करत तिस-यावर्षी प्रवेश देताना प्रवेशाचे कागदी घोडे दामटले आहे. तालुक्यातील काही खासगी शाळांत 25 टक्के प्रवेशाच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त असून, शिक्षण विभागाने अशा शाळांना प्रवेशाविषयी तंबी द्यावी.

विनाअनुदानित शाळांनी देणग्या न स्वीकारता आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना 25 टक्केकोट्यातून प्रवेश देणे सक्तीचे आहे. मात्र, खासगी शैक्षणिक संस्था त्याची दखल घेत नाहीत. तालुक्यातील एकूण 469 जागांवर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित असताना 342 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, उर्वरित 127 जागा रिक्त आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन 15 दिवस उलटूनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने शैक्षणिक संस्था नियमाला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या शाळांनी अशाप्रकारे प्रवेश पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागा रिक्त असल्याचे भासवून दुसरीकडे देणग्या घेऊन काही शाळा प्रवेश स्वीकारून उखळ पांढरे करून घेतात. शिक्षण विभाग कसे नियंत्रण ठेवते, यावरच खरे तर या आदेशाचे भवितव्य अवलंबून आहे.

कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना मिळतो खासगी शाळेत प्रवेश
केवळ परिस्थितीअभावी काही विद्यार्थ्यांना उच्च् दर्जाचे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शाळा विनाअनुदानित असल्या तरी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना तेथे मोफत प्रवेश देणे शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये बंधनकारक आहे. नियमाच्या अधीन राहून शाळांनी एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागांवर अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, शारीरिक व्यंग असलेली बालके आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सक्तीचे आहे.
शिक्षण विभागाने पालकांशी चर्चा करावी
- शाळांनी प्रवेश दिल्याचा अहवाल पंचायत समितीकडे सादर केला आहे. प्रत्यक्षात शाळांमध्ये पैसे देऊन प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थीच या यादीत असण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत, त्यांच्या पालकांशी चर्चा करावी म्हणजे वास्तव समोर येईल. काशीनाथ कहांडळ, पालक
.. तर शाळांवर कारवाई
- 25 टक्क्यांच्या प्रवेशासंदर्भात शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. अशाप्रकारे प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारले नाही, असे हमीपत्र शाळांकडून घेतले जाईल; मात्र एखाद्या पालकाने शुल्क घेतल्याची लेखी तक्रार केल्यास शाळेवर कारवाई केली जाईल. रिक्त जागा भरण्यासंदर्भात आदेश काढणार आहोत. अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सिन्नर

संस्था चालकांकडून होतेय प्रवेशाचीच ‘शाळा’
अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून प्रवेश घेणा-याविद्यार्थ्यांच्या पालकांकडून खासगी शाळा डोनेशन व फी अशा दोन्ही बाजूंनी पैसे उकळतात. तर, दुसरीकडे शिक्षण विभागाला 25 टक्के कोट्याच्या प्रवेशाची यादी सादर करताना याच प्रवर्गातील मुलांची नावे समाविष्ट करतात. त्यामुळे शिक्षण विभागाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एकूणच या प्रकारात पालक व शिक्षण विभाग या दोघांचीही दिशाभूल करत संस्थाचालक प्रवेशाची ‘शाळा’ करीत आहेत.
शाळानिहाय आकडेवारी स्वयंअर्थसहाय्यित शाळा
शाळेचे नाव एकूण कोटा भरलेल्या जागा रिक्त जागा
न्यू इंग्लिश स्कूल, सरदवाडी 13 05 08
आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, खडांगळी 05 04 01
इरा पब्लिक स्कूल, ठाणगाव 05 05 00
गुरुकृपा विद्या प्रसारक मंडळ, ठाणगाव 02 00 02
लक्ष्मणगिरी महाराज स्कूल, सोनारी 04 02 02
वाय.एस. जी. स्कूल, निमगाव-सिन्नर 03 00 03
साईनारायण गुरुकुल, कोनांबे 06 03 03
लक्ष्मणगिरी महाराज स्कूल, पांढुर्ली 07 07 00
लिटल फ्लॉवर स्कूल, शहा 17 15 02
कालभैरव शिक्षण प्रसारक संस्था, शहा 23 20 03
विनाअनुदानित शाळा
एस. जी. पब्लिक स्कूल 20 20 00
सिल्व्हर लोटस् स्कूल, सिन्नर 13 12 01
एल. के. कुलथे स्कूल, वडांगळी 08 08 00
एस.एस.के. पब्लिक स्कूल, नायगाव 08 06 02
नवजीवन डे स्कूल, सिन्नर 46 21 25
श्री इंग्लिश मीडियम स्कूल, सिन्नर 03 00 03
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, सिन्नर 24 08 16
रंगनाथ गो. पाटील, मराठी माध्यम, वावी 05 03 02
रंगनाथ गो. पाटील, इंग्रजी माध्यम, वावी 04 03 01
विद्यानिकेतन स्कूल, आगासखिंड 01 01 00
इंग्लिश मीडियम स्कूल, सरदवाडी 03 03 00
अनुदानित शाळा
संजीवनी प्राथमिक शाळा, सिन्नर 65 38 27
अभिनव बालविकास मंदिर, सिन्नर 63 60 03
सावित्रीबाई फुल विद्यामंदिर, सिन्नर 16 08 08
एस. जी. पब्लिक स्कूल, सिन्नर 51 38 13
सगुणाबाई भिकुसा विद्यामंदिर, सिन्नर 13 13 00
सावित्रीबाई पवार प्राथ. विद्यामंदिर, सिन्नर 11 10 01
टी. एस. दिघोळे विद्यामंदिर, नायगाव 30 30 00
एकूण 469 342 127