आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी ऑनलाइन प्रवेश, 27000 विद्यार्थ्यांची नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या प्रवेशासाठी वाढीव दोन दिवसांची मुदतही संपली असून, गुरुवारी (दि. २९) शेवटच्या दिवशी २६ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी भाग दुसरा अर्थात शाखानिहाय अर्ज सादर केले. परंतु, प्रथम नोंदणी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा तीन हजाराने ही संख्या कमी असून, केवळ एटीकेटी लागल्यानेच या विद्यार्थ्यांनी शाखानिहाय अर्ज भरला नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन विषय अनुत्तीर्ण असले तरीही एटीकेटीची सुविधा लागू केल्याने आता दोन विषयापर्यंत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येतो. परंतु, यंदा प्रथमच नाशिक शहर आणि देवळाली कॅन्टोन्मेंट या परिसरातील महाविद्यालयांसाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रथम टप्प्यात निकाल लागण्यापूर्वीच शाळेद्वारे नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात निकाल लागल्यानंतर शाखानिहाय प्रवेशाची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे प्रथम टप्प्यातील नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल माहितीच नसल्याने सर्वांनीच अर्ज भरले. परंतु, निकाल लागल्यानतंर अनुत्तीर्ण झालेल्या तसेच दोन विषयांत नापास झालेल्यांना एटीकेटी लागली.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच शाखानिहाय अर्जच भरता आले नाही. त्यामुळे भाग-१ आणि भाग-२ मध्ये नोंदणी झालेल्या अर्जांच्या संख्येमध्ये हजार ९९८ इतकी तफावत येत आहे. परंतु, या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेमुळे पुन्हा उत्तीर्ण होण्याची आणि भाग-२ अंतर्गत अर्ज भरण्याची संधी मिळणार आहेच. शिवाय एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण संचालकांकडून एटीकेटी प्रवेशाचे वेळापत्रक आल्यानंतर अर्जही भरता येतील. शिवाय जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; पण त्यांनी भाग-२ अंतर्गत अर्ज भरलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक फेरीनंतर शाखानिहाय अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आल्याने त्याअंतर्गत प्रवेश अर्ज भरता येणार अाहेत.
 
पुढील प्रवेशाच्या वेळापत्रकात होणार बदल
शिक्षणविभागाने ऑनलाइन प्रवेश मुदतीत दोन दिवसांनी वाढ केली हाेती. त्यानुसार २९ जून सायंकाळी वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे आता पुढील प्रवेशाची प्रक्रिया बदलणार आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप शिक्षण संचालकांकडून प्राप्त झालेले नाही. ते शुक्रवारी सकाळी शिक्षण उपसंचालकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल. शिक्षण उपसंचालकांनी शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या उपप्राचार्यांचीही बैठक आयोजित केली आहे. त्यात त्यांना प्रक्रियेबाबत सूचना दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात अाले आहे.
 
इन हाऊस कोट्याची यादी आज
संस्थानिहाय अर्थात इन हाऊस कोट प्रवेशाची यादी शुक्रवारी (दि. ३०) जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे कोटा प्रवेशानुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन खात्री करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...