आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 डिसेंबरला नाशिकला येत असून, केवळ दोन तासांच्या या दौर्यात ते मोजक्याच शंभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा करून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक रणनीती आखणार आहेत.
ठाकरे यांना लगेच औरंगाबाद येथे जावयाचे असल्याने मिळालेल्या अल्प वेळेतच स्थानिक पदाधिकार्यांना आढावा सादर करावा लागणार आहे. नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक असलेली मंडळी या दौर्यावर प्रभाव पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे. हॉटेल गेटवेमध्ये ठाकरे यांना भेटण्यासाठी मुख्य स्थानिक पदाधिकारी, सर्व नगरसेवक, युवा सेना आणि विद्यार्थी सेनेच्या शंभर पदाधिकार्यांनाच आमंत्रित केले आहे. त्यासाठी खास ओळखपत्रवजा प्रवेशपत्रांची व्यवस्था खुद्द ठाकरे यांच्या सूचनेनुसारच करण्यात आली आहे. ठाकरे या बैठकीत सर्वांशी विचार विनिमय करून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असल्याने आपल्या र्मजीतील कार्यकर्ते बैठकीला उपस्थित ठेवण्यासाठी काही पदाधिकार्यांनी नियोजनही केले आहे.
गेल्या निवडणुकीतील तिरंगी लढतीत पक्षाचे उमेदवार दत्ता गायकवाड तिसर्या स्थानी फेकले गेले होते. मनसेचे त्यावेळचे उमेदवार नगरसेवक हेमंत गोडसे यांना दुसर्या क्रमांकाची दोन लाख 60 हजार मते पडली होती. केवळ 22 हजारांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. गोडसे यांनी मनसेत घुसमट होत असल्याचे कारण देऊन लोकसभा उमेदवारीवर नजर ठेवत ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. मात्र, आता जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. ठाकरे यांच्या ताज्या भेटीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
महानगरप्रमुखासाठी प्रयत्न
शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखासह इतर पदे जाहीर झाल्यानंतर आता महानगरप्रमुख पदाकडे इच्छुक असलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले दिलीप दातीर या पदासाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत. माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनाही पुन्हा एकदा ही जबाबदारी मिळू शकते.
सोबत कुणाला आणू नये..
लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविणार्या या बैठकीचे निमंत्रण दिलेल्यांच्या ओळखपत्रावर ‘सोबत इतर कुणालाही आणू नये’, अशी महत्त्वपूर्ण टीप दिली आहे. शनिवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.
लोकसभेसाठी तिसराच उमेदवार शक्य
लोकसभेचा उमेदवार सर्वसंमतीनेच निवडला जाईल, असे ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितल्याने बैठकीसाठी आमंत्रित केलेल्या पदाधिकार्यांच्या माध्यमातून आपलेच नाव ठाकरे यांच्या कानी पोहोचण्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. गोडसे आणि करंजकर यांच्या नावावर सर्वसंमती झाली नाहीच, तर विधानपरिषद निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे सर्मथक आमदार जयवंत जाधव यांना टक्कर देणार्या शिवाजी सहाणे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.